मुंबई, 27 मार्च, 2025: भारती एअरटेल (“एअरटेल”) ही भारतातील अग्रगण्य दूरसंचार सेवा पुरवठादारांपैकी एक असून मध्य पूर्व मार्गे भारताला आफ्रिका आणि युरोपशी जोडणारी 2आफ्रिका पर्ल्स केबल देशात सुरू केली आहे.
एअरटेल भारतात 2आफ्रिका पर्ल्स केबलसाठी रमणा भागीदार (लँडिंग पार्टनर) आहे. हे सेंटर3 आणि मेटा, या 2आफ्रिका पर्ल्सच्या गुंतवणूकदारांसोबत भागीदारीत केले जात आहे.
2आफ्रिका पर्ल्स आंतरराष्ट्रीय क्षमतेपैकी सुमारे 100 टीबीपीएस (टेराबाइट्स प्रति सेकंद) भारतात आणत आहे. ही गुंतवणूक करून एअरटेलने भारताच्या डिजिटल वाढीच्या महत्त्वाकांक्षाना पाठबळ पुरविण्यासाठी आपल्या जागतिक नेटवर्कमध्ये आणखी वैविध्य सादर केले आहे.
शरत सिन्हा, संचालक आणि सीईओ, एअरटेल बिझनेस म्हणाले, “आम्ही आनंदाने 2आफ्रिका पर्ल्स केबल भारतात आणत आहोत आणि हे आमच्या नेटवर्क लवचिकतेत भर घालत आहे. आम्ही धडाडीने आमच्या जागतिक नेटवर्कमध्ये विविधता आणत आहोत आणि नुकतीच चेन्नई आणि मुंबईत एसईए-डब्ल्यूई-एमई-6 केबल आणली आहे. आम्ही जागतिक केबल प्रणाली आणि भविष्यासाठी सिद्ध अशा आमच्या नेटवर्कमध्ये गुंतवणूक सुरू ठेवणार असून हे आमच्या ग्राहकांना उच्च अपटाइम, भरवसा आणि उच्च गुणवत्तेचे नेटवर्क प्रदान करण्याच्या उद्देशाने केले जात आहे.”
2आफ्रिका पर्ल्स हा 2आफ्रिका केबल प्रणालीचा एक भाग आहे. ही प्रणाली पूर्ण झाल्यावर जगातील सर्वात लांब समुद्राखालील (सबसी) केबल प्रणाली असणार आणि ही 45,000 किलोमीटरपेक्षा जास्त पसरली असून आशियाला मिडल ईस्ट मार्गे आफ्रिका आणि युरोपशी जोडणार आहे. 2आफ्रिका केबल प्रणालीचे नेतृत्व बायोबाब, सेंटर3, चायना मोबाइल इंटरनॅशनल, मेटा, ऑरेंज, टेलिकॉम इजिप्ट, व्होडाफोन ग्रुप आणि डब्ल्यूआयओसीसी यांचे समोद्देशी संघ (कन्सोर्टियम) करत असून केबलचे उत्पादन आणि स्थापना करण्याची जबाबदारी अल्काटेल सबमरीन नेटवर्क्स वर आहे.
एअरटेलचे जागतिक नेटवर्क 50 देश आणि पाच महाद्वीप यांच्यात 400,000 आरकेएम (रूट किलोमीटर) एवढे पसरलेले आहे. कंपनीने जागतिक स्तरावर 34 केबल्स मध्ये गुंतवणूक केली असून 2आफ्रिका, साऊथ ईस्ट आशिया-जपान केबल 2 (एसजेसी2) आणि इक्विआनो अलीकडील गुंतवणुकीत सामील आहेत. एपीएसी, युरोप, मिडल ईस्ट आणि अमेरिका यासारख्या महत्त्वाच्या प्रदेशांशी भारताला जोडणाऱ्या या केबल्स शिवाय एअरटेलच्या जागतिक समुद्राखालील (सबसी) नेटवर्क गुंतवणुकीत इतरांमध्ये मोठ्या केबल प्रणाली सामील आहेत, जसे की, आय2आय केबल नेटवर्क (आय2आयसीएन), युरोप इंडिया गेटवे (ईआयजी), आयएमईडब्ल्यूई, एसईए-एमई-डब्ल्यूई-4, एएजी, युनिटी, ईएएसएसवाय, गल्फ ब्रिज इंटरनॅशनल (जीबीआय) आणि मिडल ईस्ट नॉर्थ आफ्रिका सबमरीन केबल (एमईएनए केबल).