रत्नागिरी:येथील विमानतळ नागरी उड्डाणासाठी सुरू व्हावा यासाठी कार्यवाही सुरू करण्यात आली असून टाईम बाऊंड कार्यक्रम आखत टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डान मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. येत्या काही महिन्यात नागरी उड्डानासाठी रत्नागिरी विमानतळ सज्ज होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.केंद्र सरकारने १९७३ साली रत्नगिरीतील मिरजोळे येथे विमानतळ बांधून राज्य सरकारच्या सुपूर्त केले. त्यानंतर तब्बल २४ वर्षानंतर या विमानतळाचे विस्तारीकरणही झाले. सन १९९१ पर्यंत येथे नियमित विमानसेवाही सुरू होती आणि ती येथील व्यापायांसाठी उपयुक्तही ठरत होती. मात्र त्यानंतर अनेक कारणांनी ही विमानसेवा बंद पडली आणि गेल्या २५ वर्षात ही सेवा नियमित करण्यासाठी फारसे प्रयत्न केले गेले नाहीत. याच दरम्यान सन २००८ मध्ये कोस्टगार्डने किनारा सुरक्षेच्या दृष्टीने उपयोग करण्यासाठी हे विमानतळ ताब्यात घेतले. त्यामुळे त्याचा प्रवासी आणि व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने होणारा वापर पुर्णपणे थांबला गेला. याच दरम्यान २०१४ रोजी इंडियन बुल्स या कंपनीसोबत प्राथमिक टप्प्यावर चर्चा करून रत्नागिरी- मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु त्यावेळी कोस्ट गार्डने प्रवासी वाहतुकीसाठी रत्नागिरी विमानतळाची धावपट्टी अत्यंत धोकादायक असून धावपट्टीचा पृष्ठभाग अयोग्य असल्याचे पत्र केंद्र सरकारला दिले. त्यामध्ये धावपट्टीवर विमानाचं सुरक्षितरित्या लॅन्डींग होण्यासाठी ३३ पीसीएम ची आवश्यकता असते. मात्र, रत्नागिरी विमानतळाची सध्याची धावपट्टी ही १० पीसीएम पेक्षाही कमी आहे. तटरक्षक दलाकडून त्यांच्या विमानांसाठी धावपट्टीची लांबी वाढविण्यासाठीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र त्याचा नागरी उड्डानासाठी वापर होणार नसल्याचे कमांडट एस. आर. पाटील यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यासाठी नागरी उड्डान मंत्रालयाकडून स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.
हे विमानतळ नागरी उड्डानासाठी खुले होईल अशी घोषणा करत खासदार विनायक राऊत यांनी दोन तारखाही यापूर्वी घोषित केल्या होत्या. मात्र तशा कोणत्याही हालचाल दिसत नसतानाच केंद्रीय नागरी उड्डान मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेल्या ना.सुरेश प्रभू यांनी रत्नागिरीमध्ये येत मिरजोळे विमानतळाची पाहणी केली आणि तेथील तटरक्षक दल, केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस यांची भेट घेऊन याबाबत माहिती घेतली. याची माहिती पत्रकार परिषदेत देताना ना. प्रभू म्हणाले की अद्यापही नागरी उड्डाणासाठी विमानतळाचे बरेच काम अपूर्ण आहे, त्याला कालावधीही बराच लागणार आहे. मात्र त्यासाठी या सर्व अधिका-यांना टाईम बाऊंड कार्यक्रम देण्यात आला असून त्यासाठी टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. यासाठी ३५० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली असून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हे काम वेगाने व्हावे यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.