
रत्नागिरी, (आरकेजी) : चिपळूणचे सुपुत्र एअर मार्शल हेमंत नारायण भागवत यांची भारतीय वायू सेनेच्या प्रशासकीय विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एअर मार्शल भागवत यापूर्वी वायू सेनेच्या मुख्यालयात महासंचालक (वर्क अँड सेरेमोनीयल) पदावर कार्यरत होते. पॅराट्रुपींग मधील महत्वपूर्ण योगदानासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते वायू सेना पदकाने त्यांना गौरविण्यात आले आहे. तसेच, वायुसेनेतील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अतीविशिष्ट सेवा पदक व विशीष्ट सेवा पदाकानेही सन्मानित करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट 2017 रोजी भागवत यांनी नव्या पदाची सूत्रे स्वीकारली.
भागवत यांनी वेलींग्टन येथून संरक्षण सेवेतील पदवी मिळवली आहे. हैदराबाद येथून त्यांनी हायर एअर कमांड विषयक अभ्यास केला तर सिकंदराबाद येथून संरक्षण व्यवस्थापकीय अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. मद्रास विद्यापीठातून त्यांनी सैनिकी डावपेच विषयक अभ्यासक्रमात विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले तर उस्मानिया विद्यापीठातून एमफील पूर्ण केले आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या या सुपुत्राने वायू दलात घेतलेल्या या भरारीबद्दल सर्वत्र कौतुक व अभिमान व्यक्त होत आहे.