मुंबई : रिक्षामध्येही प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव देता येऊ शकतो, हे लक्षात घेऊन विक्रोळीतील विलास पवार या रिक्षाचालकाने अनोखी शक्कल लढविली आहे. त्यासाठी त्याने स्वत:च्या रिक्षातच एअर कुलर बसवून प्रवाशांच्या एसी वाहनांच्या तोडीसतोड सेवा देऊ केली आहे. त्यांच्या या सेवेचे पूर्व उपनगरात कौतुक केले जात आहे.
वय ५२ वर्ष असणार्या पवारांनी रिक्षामध्ये स्वत:हून बनवलेला कुलर बसवला आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारचा एअर कुलर इतर रिक्षाचालकांनाही कमी पैशात उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांनी बनविलेल्या कुलरमधील काही तांत्रिक चुका सुधारून ते त्याचा स्वामीत्व हक्क घेणार आहेत.
अशी आहे रचना
रिक्षाच्या वर पवार यांनी एअरडक्ट बसविले आहे. यानंतर त्यांनी रिक्षाच्या आत दोन पंखे बसविले आहेत. एक स्वंयचलीत मोटर असून त्या मोटरीद्वारे एअर कुलर सुरू केला जातो. यानंतर पंखे सुरू केले जातात आणि थंड हवा बाहेर फेकली जाऊन प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव मिळतो.
रिक्षात इतरही सुविधा
आरामदायी प्रवासाठी त्यांनी पेपर स्टॅन्ड, पिण्यासाठी पाणी, प्रथमोपचार पेटी ठेवली आहे. अनाथ मुलांना मदत व्हावी यासाठी दानपेटी आहे. पेटी विक्रोळी पोलीस ठाण्याकडून सीलबंद केली गेली आहे. सहा महिन्यानंतर दानपेटी पोलिसांचा समक्ष उघडण्यात येणार आहे.
चौथा प्रवासी बसू नये म्हणून शक्कल
चौथा प्रवासी बसू नये, यासाठी चालकाकडील सीटच्या बाजूला पवार यांनी अतिरिक्त टायर बसवला आहे. काही रिक्षाचालक ४ प्रवासी वाहून नेतात. पण जर जागाच नसेल तर चौथा प्रवासी बसण्याचा प्रश्न उद्धवू नये त्यासाठी त्यांनी ही शक्कल लढविली आहे.
लोकगीते आणि प्रतिमा
या रिक्षामध्ये लोकगीते ऐकविण्यात येतात. रिक्षाच्या सीटकडील मागील बाजूस छत्रपत्री शिवाजी महाराज यांची राज्यभिषेकाची प्रतिमा लावली आहे. प्रवासी आसनाचा समोरील बाजूस त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, परमवीर अब्दुल हमीद, राज गुरु, शहीद भगत सिंग, सुखदेव यांचीही प्रतिमा लावली आहे. तरुणांसमोर या सर्वाचा आदर्श रहावा, असा उद्देश यामागे आहे. रिक्षात मद्यपी आणि सिगारेट पिणाऱ्यांना बंदी आहे.रिक्षाची सजावट पवार यांनी स्वत: केली आहे. चालकाच्या समोरील बाजूस त्यांनी गणपतीचा सुदंर रथदेखील बसवला आहे.
प्रतिक्रिया
यापूर्वी फेब्रिकेशनच्या व्यवसायात असल्याने मला एअर कुलरची कल्पना सूचली. ही सेवा प्रवाशांना आवडत आहे, याचा मला आनंद आहे. प्रवाशांना आणखी उत्तम सेवा कशी देता येईल, यासाठी मी प्रयत्नशील राहीन.
-विलास पवार, रिक्षाचालक