मुंबई । अखिल भारतीय जनवादी महिला संघटना (AIDWA) ही भारतातील सर्वात मोठ्या महिला संघटनांपैकी एक संघटना आहे, जिचे २३ राज्यांमध्ये १ कोटीहून जास्त सभासद आहेत व जी महिला अधिकार, समानता आणि सुरक्षिततेसाठीच्या लढ्यांसाठी ओळखली जाते. त्यांचे १२वे राष्ट्रीय अधिवेशन २७ ते ३० डिसेंबर २०१९ दरम्यान मुंबईत पहिल्यांदाच होणार असून त्याची सुरुवात आज आझाद मैदानावर झालेल्या मिरवणूक व जाहीर सभेनी झाली.
अधिवेशनाच्या या रॅलीत २४ राज्यांमधून आलेल्या ८०० प्रतिनिधी व ५० महत्वाच्या व्यक्ती उपस्थित होत्या. त्यात मंत्री, माजी मंत्री, आजी, माजी आमदार, खासदार यांचा समावेश होता. सभेच्या सुरवातीला राज्य सचिव प्राची हातिवलेकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. राज्य अध्यक्षा नसीमा शेख सभेच्या अध्यक्ष होत्या. सभेला बृंदा कारत व सुभाषिनी अली या महिला चळवळीतील नेत्या, अ. भा. किसान सभेचे अध्यक्ष डॉ अशोक ढवळे, सिटूचे राज्य सचिव व नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले तसेच जनवादी महिला संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षा, माजी खासदार मालिनी भट्टाचार्य व राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे यांनी संबोधित केले.
अधिवेशनाचे उद्घाटन सत्र भायखळा येथील साबू सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय अध्यक्षा मालिनी भट्टाचार्य यांच्या हस्ते जनवादी महिला संघटनेचा झेंडा फडकवून झाले. त्यानंतर चळवळीतील शहिदांच्या स्मारकाला वंदन करण्यात आले. जन नाट्य मंचाच्या क्रांतिगीते व स्वागतपर गीतांनी वातावरण भारून टाकले. महासचिव मरियम ढवळे यांनी प्रास्ताविक केल्यानंतर शोकप्रस्ताव मांडून चळवळीत योगदान दिलेल्या सर्व दिवंगत नेत्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर एआयफुक्टोच्या अध्यक्षा व स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. तापोती मुखोपाध्याय यांनी स्वागतपर भाषण केले. त्यांनी महाराष्ट्राच्या पुरोगामी महिला चळवळीचा इतिहास उलगडून दाखवला. १२वे अधिवेशन पुढे येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठीची रणनिती ठरविण्यात यशस्वी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या स्वागतपर भाषणानंतर सुप्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर, डॉ खान, बृंदा कारत आणि बांग्लादेश महिला परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ फौझिया मोस्लेम यांचा सत्कार करण्यात आला.
स्वरा भास्कर यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात हे अधिवेशन ज्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात येत आहे त्याबद्दल भाष्य केले. तुम्ही खऱ्या अर्थाने या अत्याचारांच्या विरोधात लढत आहात असे उद्गार काढत त्यांनी संघटनेच्या लढाऊ कार्यकर्त्यांना सलाम केला. त्यानंतर बृंदा कारत यांनी आपल्या प्रमुख भाषणात महिला चळवळीसमोरील आव्हानांवर प्रकाश टाकला. जनवादी महिला संघटनेच्या संस्थापक गोदुताई परुळेकर, विमलताई रणदिवे आणि अहिल्याताई रांगणेकर यांनी महिला चळवळ व कामगार वर्गाच्या लढ्यामध्ये बजावलेल्या महत्वपूर्ण भूमिकेबद्दल त्यांनी आदर व्यक्त केला. महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या पुरोगामी परंपरेचा त्यांनी आदराने उल्लेख केला. पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि केरळमधील महिला हाच वारसा घेऊन संघ परिवार आणि भाजप, तृणमूलसारख्या लोकशाही विरोधी पक्षांच्या विरोधात लढत आहेत असे त्या म्हणाल्या. आजच्या राजकीय, आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करत त्यांनी महिला चळवळीसमोर कोणती आव्हाने आहेत यावर प्रकाश टाकला. रोझा लक्झेंबर्ग यांच्या “तुम्ही काहीही करा, आम्ही होतो, आहोत आणि कायम राहणार आहोत” या प्रेरणादायी वाक्याने त्यांनी भाषणाचा शेवट केला.
‘प्रतिरोधाची पदचिन्हे’ या सत्रात जनवादीच्या कार्यकर्त्या आणि महिलांच्या काही लढ्यांना सलाम करण्यात आला. दमनकारी सामाजिक, राजकीय व्यवस्थेच्या विरोधात लढणाऱ्या सामाजिक पुराणमतवाद, तथाकथित इज्जतीसाठी झालेल्या हत्यांना टक्कर देणाऱ्या, संघ परिवाराला विरोध करत लोकशाही मूल्ये जिवंत ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या, सरकारच्या नवउदार कृषी धोरणांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आठ भगिनींचा सत्कार करण्यात आला. आंध्र प्रदेशातील स्नेहा, हरियाणातील सूरज, केरळची संजिनी, त्रिपुराची रेखा सूत्रधरआणि महाराष्ट्राच्या किसान लाँग मार्चचा चेहरा बनलेल्या सक्कुबाई आणि कमली लाहोटा यांचा त्यात समावेश होता. अध्यक्षा मालिनी भट्टाचार्य यांच्या भाषणाने उद्घाटन सत्राचा समारोप करण्यात आला.
अधिवेशनाची प्रमुख घोषणा आहे “आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी, महिलांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी सर्व येऊया एकत्र, लढुया एकत्र, पुढे जाऊया एकत्र”. अधिवेशनात देशभरात महिला नागरिक म्हणून, कामगार, कष्टकरी म्हणून आणि महिला म्हणून ज्या प्रश्नांना, अत्याचारांना तोंड देत आहेत, लढत आहेत त्यावर चर्चा होऊन पुढील ३ वर्षांसाठीचा कार्यक्रम निश्चित केला जाईल.
या चार दिवसांमध्ये अधिवेशनाच्या स्थळाच्या ठिकाणी संघटनेच्या नेत्यांच्या तसेच जम्मु काश्मीर पासून पूर्ण देशातील प्रतिनिधींच्या मुलाखती घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींचे स्वागत आहे. त्यासाठी व अधिक माहितीसाठी कृपया संपर्क करावा असे आवाहन शुभा शमीम यांनी केले आहे.