मुंबई । अखिल भारतीय जनवादी महिला संघटना(AIDWA) ही भारतातील सर्वात मोठ्या महिला संघटनांपैकी एक संघटना आहे. संघटनेचे २३ राज्यांमध्ये १ कोटीहून जास्त सभासद आहेत. ही संघटना महिला अधिकार, समानता आणि सुरक्षिततेसाठीच्या लढ्यांसाठी ओळखली जाते. त्यांचे १२वे राष्ट्रीय अधिवेशन २७ ते ३० डिसेंबर २०१९ दरम्यान मुंबईत पहिल्यांदाच होणार आहे. भायखळा येथील साबू सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालयात अधिवेशन होईल. याबाबत माहिती देण्यासाठी आज मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद घेण्यात आली. राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे, स्वागत समिती अध्यक्षा तापोती मुखोपाध्याय, राज्य महासचिव प्राची हातिवलेकर माध्यम संयोजक शुभा शमीम यांनी यावेळी अधिवेशनाबाबत सविस्तर माहिती दिली.
अधिवेशनात ८०० प्रतिनिधी व ५० महत्वाच्या व्यक्ती उपस्थित राहणार असून त्यात मंत्री, माजी मंत्री, आजी, माजी आमदार, खासदार यांचा समावेश असेल. या अधिवेशनाची जाहीर सभा २७ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता आझाद मैदान येथे होईल. सभेला बृंदा कारत व सुभाषिनी अली या महिला चळवळीतील नेत्या, अ. भा. किसान सभेचे अध्यक्ष डॉ अशोक ढवळे, सिटूचे राज्य सचिव व नवनिर्वाचित आमदार विनोद निकोले तसेच जनवादी महिला संघटनेच्या अखिल भारतीय अध्यक्षा, माजी खासदार मालिनी भट्टाचार्य व राष्ट्रीय महासचिव मरियम ढवळे संबोधित करतील. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता साबु सिद्दिक अभियांत्रिकी महाविद्यालय, भायखळा येथे जेएनयुच्या माजी विद्यार्थिनी व लोकशाही चळवळीसाठीची आपली बांधिलकी खुलेपणाने दर्शवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्री, स्वरा भास्कर यांच्या हस्ते उद्घाटन केले जाईल. हे सत्र सर्वांसाठी खुले असणार आहे.
“आपल्या संविधानाच्या रक्षणासाठी, महिलांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी सर्व येऊया एकत्र, लढुया एकत्र, पुढे जाऊया एकत्र”, ही अधिवेशनाची प्रमुख घोषणा आहे.
अधिवेशनात देशभरात महिला नागरिक म्हणून, कामगार, कष्टकरी म्हणून आणि महिला म्हणून ज्या प्रश्नांना, अत्याचारांना तोंड देत आहेत, लढत आहेत त्यावर चर्चा होऊन पुढील ३ वर्षांसाठीचा कार्यक्रम निश्चित केला जाईल. अत्याचारांशी दोन हात करणाऱ्या प बंगाल, त्रिपुरा, केरळ, तामिळनाडु, हरियाणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांमधील काही प्रातिनिधिक महिलांचा अधिवेशनात सत्कार देखील केला जाणार आहे. या चार दिवसांमध्ये अधिवेशनाच्या स्थळाच्या ठिकाणी संघटनेच्या नेत्या तसेच जम्मु काश्मीर पासून पूर्ण देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.