मुंबई : आगीची एखादी घटना घडल्यास नागरिकांनी काय खबरदारी घेणे आवश्यक आहे याची जनजागृती व्हावी, यासाठी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलातर्फे १४ ते २० एप्रिल या दरम्यान अग्निशमन सेवा सप्ताह घेण्यात येत आहे.
सप्ताहानिमित्त बृहन्मुंबई महापालिका मुख्यालय येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गाव्दारे फाईव्ह गार्डन –एल.बी.एस. मार्ग- विक्रोळी अग्निशमन केंद्रापर्यंत आज रविवारी ‘ध्वज संचलन’ रॅली काढण्यात आली. मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज सकाळी महापालिका मुख्यालय येथून ध्वज फडकावून या रॅलीला मार्गस्थ केले.
महापालिकेचे अग्निशमन दल समर्थपणे मुंबईतील नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सांभाळत आहे, असे गौरवोद्गार महाडेश्वर यांनी काढले.
या रॅलीमध्ये सुरक्षा दलाचा वाद्यवृंद, मुंबई अग्निशमन दलाचे पहिले वाहन, पुणे अग्निशमन दलाचे वाहन, मुंबई अग्निशमन दलातील चार हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असलेले वाहन, फोम ट्रेडर वाहन,नियंत्रण कक्षाचे वाहन, जम्बो टॅंकर, १८ हजार लिटर पाणी क्षमतेचे टिस्को वाहन, श्वसन उपकरण वाहन, भाभा अणुउर्जा केंद्राचे वाहन, ५५ मिटर उंच शिडीचे वाहन, भारतातील सर्वात मोठी उंचीची ब्रॉन्टो स्कॉय लिप्ट वाहन,भारतीय नौदलाचे अग्निशमन वाहन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अग्निशमन वाहन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे फायर फायटिंग वाहन, समुद्रात अडकलेल्या व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी जिवरक्षक जेट किट वाहन याप्रकारातील स्वंयचलित वाहनाचा ताफा सहभागी करण्यात आला होता.
महापौर महाडेश्वर म्हणाले की, मुंबई अग्निशमन दलाचे जवान आपला जीव धोक्यात घालून मुंबईकर नागरिकांचे सदैव रक्षण करित असतात. त्यांच्याप्रमाणे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेतल्यास छोटया- मोठया आगीवर नियंत्रण मिळविणे शक्य होऊ शकते. मुंबई अग्निशमन दलाचे कार्य हे कौतुकास्पद आहे. अग्निशमन सेवा सप्ताहनिमित्त दलातील जवानांना शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.
या रॅलीत अग्निशमन दलाच्या खुल्या वाहनातून महापालिका मुख्यालय ते परळच्या पुलापर्यंत महापौर सहभागी झाले होते. मार्गातील नागरिकांशी उत्स्फूर्तपणे त्यांनी संवाद साधला.