
Mumbai : अग्निपथ योजनेअंतर्गत देशाच्या सैन्यदलामध्ये कंत्राटी सैनिक भरती करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चा व अखिल भारतीय किसान सभेने 24 जून 2022 रोजी देशभर तीव्र आंदोलन करण्याची हाक दिली आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत युवकांना केवळ चार वर्षासाठी सैन्यात भरती करून घेतले जाणार असून चार वर्षाच्या सेवेनंतर भरती झालेल्यापैकी 75% युवक-युवतींना सैन्यदलातून काढून टाकले जाणार आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्यात घेण्यात आलेल्या या युवक-युवतींना केवळ अडीच महिने ते सहा महिन्याचे तोकडे प्रशिक्षण दिले जाणार आहे. देशाच्या सुरक्षेशी खेळ करण्याचा हा अत्यंत निंदनीय असा हा प्रकार आहे. सैन्यदलाच्या गुणवत्तेशी व कार्यक्षमतेशी करण्यात येत असलेला हा खेळ देशाची सुरक्षितता धोक्यात आणणारा आहे. निवृत्ती वेतनाचे पैसे वाचावे यासाठी देशाच्या सुरक्षिततेबाबत अशा प्रकारची जोखीम घेणे कोणत्याही पातळीवर समर्थनीय नाही.
चार वर्षांत निवृत्त होऊन नागरी आयुष्यात परतणाऱ्या युवक-युवतींना अशा अकाली निवृत्तीनंतर बेरोजगार व्हावे लागणार असल्याने यामुळे जटिल प्रश्न निर्माण होणार आहेत.
जनतेच्या लष्करीकरणाचा आपला छुपा अजेंडा संघ परिवार या माध्यमातून पुढे नेत असून यामुळे देशाची एकता, सार्वभौमत्व व लोकशाहीलाही मोठे आव्हान दिले गेले आहे.
सैन्यदलात आज मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मेडिकल व डेंटलची पदे धरून एकूण तब्बल 1 लाख 45 हजार 327 पदे सैन्यदलामध्ये रिक्त आहेत. या रिक्त पदांवर अग्निपथ योजनेअंतर्गत केवळ 46,000 पदे भरली जाणार असून ही पदे ही कंत्राटी पद्धतीने केवळ चार वर्षासाठी भरली जात आहेत.
देशाच्या सुरक्षेसाठी अतिउच्च बलिदान देण्यास तयार असलेल्या सैनिकांना कायम नोकरीची साधी हमी सुद्धा दिली जाणार नसेल तर हा अत्युच्च बलिदानाच्या भावनेचा व देशप्रेमाचा घोर अपमान आहे. सैन्य दलात सामील होऊ पाहणारे बहुतेक विद्यार्थी, युवक हे शेतकरी कुटुंबातील आहेत. सीमेवर देशाचे रक्षण करणारे बहुतांश सैनिक गणवेशधारी शेतकरीच आहेत. संयुक्त किसान मोर्चाने यामुळेच सीमेवर लढणाऱ्या व सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्या सैनिकांच्या मागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे.
मोदी सरकार प्रणित, सैन्याच्या कंत्राटीकरणाला वाव देणाऱ्या अग्निपथ योजनेची पहिली भरती 24 जून रोजी सुरू होत असल्याने याच दिवशी देशभर आंदोलन करून या योजनेचा निषेध करण्याचा निर्णय संयुक्त किसान मोर्चाने घेतला आहे.
अखिल भारतीय किसान सभेने देशस्तरावर या निर्णयाचे स्वागत केले असून देशभरातील सर्व किसान सभेच्या शाखांना या आंदोलनात पूर्ण ताकदीने सक्रिय होण्याच्या सूचना केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये यानुसार 24 जून रोजी किसान सभेच्या सर्व शाखा या आंदोलनात सहभागी होत आहेत. किसान सभेकडून तहसीलदार कार्यालयांच्या समोर निदर्शने करून या योजनेचा निषेध करणारी निवेदने राज्यभरातील सर्व तहसीलदारांना दिली जाणार आहेत.
देशाच्या सुरक्षेशी खेळ करणाऱ्या व देशभरातील सैन्यात भरती होऊ पाहणाऱ्या युवक व विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रतारणा करणाऱ्या केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेचा देशभरातील शेतकरी, युवक, विद्यार्थी व जनतेने तीव्र निषेध करावा व आंदोलनात सक्रिय व्हावे असे आवाहन डॉ अशोक ढवळे, जे पी गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले या प्रमुख नेत्यांनी केलं आहे.















