मुंबई, (निसार अली) : आरे मधील प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी आज आरे वसाहतीत हजारो पर्यावरणप्रेमी नागरिकांनी तीव्र निदर्शने केली. राष्ट्र सेवा दल, आम आदमी पार्टी, डीवायएफआयनेही या आंदोलनाला पाठिंबा देत सहभाग नोंंदवला. स्थानिक आदिवासी पाड्यातील ग्रामस्थही सहभागी झाले होते. राष्ट्रवादीच्या खासदार यांनीही उपस्थित राहत आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
वनावर आदिवासिंचा हक्क आहे. वने नष्ट करू नका. स्वच्छ हवेत आम्हाला जगू द्या, वृक्ष वाचविण्यासाठी स्वतःचे रक्त सांडू असा इशारा उपस्थित आदिवासी लहान मुलांनी दिला.
विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष तसेच सामान्य नागरिक यांनी 27OO झाडांच्या संभाव्य तोडीला विरोध करताना निदर्शने केली. आरे वाचवा, झाडे जगवा या मोहिमेला सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे. शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनीही आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.
आरे जंगल हे मुंबईचे फुफ्फुस आहे. ते नष्ट केल्यास पर्यावरणावर दुष्परिणाम होतील. वृक्ष न तोडता कारशेडसाठी दुसरी जागा शोधा. मुंबईचे आणखी नुकसान करू नका, अशा संतप्त भावना पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केल्या.