रत्नागिरी, (आरकेजी) : राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केलेल्या वक्तव्याच्या निषेधासाठी आज नाणार परिसरात निदर्शने करत धरणे आंदोलन करण्यात आलं. हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. यावेळी सरकारसह मुख्यमंत्र्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून सध्या राज्याचं राजकारण तापलं आहे. विधिमंडळातही जोरदार पडसाद उमटले. या मुद्द्यावरून सर्वपक्षीयांनी सभागृहही बंद पाडलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सभागृहात यावेळी ग्रामस्थांशी चर्चा सुरु असल्याचे विधान केलं होतं. मात्र मुख्यमंत्र्यांचं हे विधान खोटं असल्याचं सांगत ग्रामस्थानी निदर्शने करत आज धरणे आंदोलन केलं. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. राजापूरच्या डोंगर तिठा येथे 14 गावातील ग्रामस्थानी एकत्र येत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भर पावसात देखील डोंगर तिठा इथं हजारोंच्या संख्येनी आलेल्या प्रकल्पग्रस्तांनी निदर्शने केली. तसेच ज्या शेतकऱ्यांनी नाणार प्रकल्पासाठी जमिनी दिल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केली, त्या शेतकऱ्यांची नावे का जाहीर केली जात नाहीत असा थेट सवाल करत मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. ज्यांनी संमती दिली आहे असे सगळे शहा, मोदी आणि मेहताच असल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे आहे. जमीन आमच्या हक्काची आहे, त्यामुळे आम्ही याठिकाणी सरकारला पाऊलही ठेऊन देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.