रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): मानधनवाढीच्या मागणीसाठी अंगणवाडी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. मात्र राज्यव्यापी बेमुदत संपाबाबत अद्याप कोणताच तोडगा न निघाल्यामुळे आज राज्यभर जेलभरो आंदोलन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातही जवळपास पाच हजार अंगणवाडी कर्मचारी- सेविकांनी निदर्शने केली.
रत्नागिरी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मतदनीस यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी एल्गार पुकारला. आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आज जेलभरो केले. आज सकाळी ११ वाजता शहरातील प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस जमा झाल्या. दिडवर्ष अंगणवाडी सेविकांच्या अनेक समस्या तशाच प्रलंबित आहे. या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे मानधनात वाढ व्हावी या प्रमुख मागणीसाठी हे जेलभरो आंदोलन करण्यात आलं. इथं आलेल्या अंगणवाडी सेविकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर स्वतःहून शांततेच्या मार्गांनी या अंगणवाडी सेविकांनी जेलभरो केले. जिल्ह्याच्या कानाकोरऱ्यातून आलेल्या या शेकडो मोर्चेकरांच्या उन्हात मात्र चांगलेच हाल झाले. दरम्यान या जेलभरो आंदोलनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिसांनी तेथेच या सर्वांना ताब्यात घेतलं आणि त्यानंतर नाव नोंदणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.