अंगणवाडी कर्मचारी निर्दशने (संग्रहित फोटो)
महाराष्ट्रत सुमारे २लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांना दरमहा ५००० तर मदतनिसांना २५०० असे तुटपुंजे मानधन दिले जाते. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची शासनाद्वारे नेमणूक केली जाते. मात्र त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यास शासन तयार नाही. जिल्हा परिषदेची कामेही सेविकांकडून करवून घेतली जातात. मात्र त्यांना कामाचा पुरेसा मोबदला देताना हात आखडता घेतला जातो. किमान वेतन अथवा सामाजिक सुरक्षाचा लाभ दिला जात नाही. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमार्फत ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांना टी.एच.आर. दिला जातो. तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असतो. त्यामुळे बालकांचे कुपोषण वाढले आहे. त्यांना पूरक पोषक आहार देण्यासाठी देण्यांत येणाऱ्या रकमेत तिपटीने वाढ करावी, अशी कृती समितीची मागणी आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जून महिन्यापासून वेतन मिळाले नाही. मानधन वाढीसह विविध मागण्यांसाठी अनेकदा आंदोलन केल्यानंतर केवळ आश्वासनावर बोळवण केली जाते. मात्र त्याची पूर्तता केली जात नाही. त्यामुळे २ लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ११ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे.