
रत्नागिरी,(विशेष प्रतिनिधी) : अखेर दहा वर्षांच्या प्रदिर्घ लढ्यानंतर कोकणच्या हापूसला अखेर न्याय मिळाला. हापूसचा जीआय मानांकनात समावेश झाला आहे. 2008 पासून कोकणच्या हापूसला जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. या प्रस्तावाला अनेक हरकती आल्याने कोकणच्या हापुसचे जीआय मानांकन रखडले होते. मात्र, 3 आँक्टोबरला कोकण कृषी विद्यापीठाच्या नावाने हापूसला जीआय मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. यामुळे जीआय प्रमाणपत्र मिळालेला हापूस आंबा 139 वा फळ ठरला आहे. यापूर्वी 323 जीआय मानांकन प्रमाणपत्र भारत सरकारतर्फे देण्यात आली आहेत या कोकणच्या हापूसचा 324 वा क्रमांक आहे. यापुर्वी आंब्यामध्ये मराठवाड्याच्या केशर आंब्याला जीआय मानांकन मिळाले आहे. कोकणातील कोकमालाही यापुर्वी जीआय मानांकन मिळाले आहे. हापूसला जीआय मानांकन मिळाल्याचा फायदा हापूसच्या उत्पादकांबरोबरच हापूसच्या खरेदीदारांनाही मिळणार आहे. कोकणातून येणारा हापूस आता जीआय मानांकनाच्या लोगोसह बाजारात येण शक्य होणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी विकास अधिकारी आरीफ शाह यांनी दिली.