
मुंबई : जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्र (JUM) मुंबईची नवीन कार्यकारिणी (कालावधी १ जानेवारी २०२६ ते ३१ डिसेंबर २०२७) अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आली आहे. पत्रकारांच्या हक्कांचे संरक्षण, संघटन बळकटीकरण तसेच पत्रकारितेच्या मूल्यांची जोपासना करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी कार्यरत राहणार आहे.
नवीन कार्यकारिणीत ऍड. प्रशांत गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. जीवन तांबे आणि निसार अली यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजेंयकुमार जाधव यांची सरचिटणीसपदी निवड झाली असून, रविंद्र भोजने आणि संतोष गायकवाड यांची चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर स्नेहल मसुरकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली आहे.
याशिवाय कार्यकारिणी सदस्य म्हणून मुकेश धावडे, अमोल पेडणेकर, रविंद्र साबळे आणि मंजिरी साबळे यांचा समावेश करण्यात आला आहे.
जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्र (JUM) ही संघटना देशातील नामांकित इंडियन जर्नलिस्ट युनियन (IJU) शी संलग्न असून, पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविण्याचे कार्य करत आहे. पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, मानधन तसेच कामाच्या अटी सुधारण्यासाठी JUM नेहमीच सक्रिय भूमिका बजावत आली आहे.
मुंबई शहर कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेत JUM चे सरचिटणीस राजेंद्र साळसकर यांनी मुंबई निवड समितीत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली निवड प्रक्रिया पारदर्शक आणि संघटनात्मक शिस्तीत पार पडली, अशी माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.
या सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे JUM चे अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे. लवकरच सर्व पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून मुंबई शहरातील पत्रकारांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नवीन कार्यकारिणीला विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत असून, आगामी काळात जर्नालिस्ट् युनियन ऑफ महाराष्ट्र – मुंबई शहर शाखा अधिक सक्षम, सक्रिय आणि प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.















