रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. दीपक पटवर्धन यांची निवड करण्यात आली. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या कोअर समितीची महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. भाजपच्या जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी अध्यक्ष बाळ माने यांनी नूतन जिल्हाध्यक्षांची घोषणा केली.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बाळ माने म्हणाले, १५ जानेवारी २०१४ ला पक्षाने माझ्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. अध्यक्षपदाचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मला मुदतवाढ देण्यात आली होती. मला मिळालेल्या अध्यक्षपदाच्या कालावधीत जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपसाठी प्रयत्न केला. या प्रयत्नांना भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे सहकार्य मिळाले.
आज झालेल्या पक्षाच्या कोअर समितीच्या बैठकीत भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष म्हणून ॲड. दीपक पटवर्धन यांची निवड करण्यात आली. त्यामुळे माझे उत्तराधिकारी म्हणून यापुढे ॲड. पटवर्धन जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. गेली ३० वर्षे आम्ही दोघेही एकत्र काम करत आहोत. एक कुशल संघटक आणि सहकार क्षेत्रातील गाढा अभ्यास असलेले ॲड. पटवर्धन हे निश्चितच चांगले योगदान देतील, असा विश्वास बाळ माने यांनी यावेळी व्यक्त केला.
या पत्रकार परिषदेला माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, तालुकाध्यक्ष सतिष शेवडे, शहराध्यक्ष प्रशांत डिंगणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.