मुंबई : वादग्रस्त नाणार प्रकरणावरून शिवसेना-भाजप आमनेसामने ठाकले आहेत. प्रकल्पाला शिवसेनेने तीव्र विरोध करताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. मात्र काहीच तासात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिसूचना रद्द करण्याचे अधिकार देसाईंना नसून ती रद्द झाली नसल्याचा दावा केला, त्यामुळे शिवसेना भाजपमध्ये आता संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
आधी नाणारची अधिसूचना रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी केली असता राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज नाणारच्या सभेत नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली. या निर्णयावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नाणार प्रकल्पासाठीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची घोषणा ही उद्योगमंत्री देसाई यांचे वैयक्तिक मत असून, ही अधिसूचना रद्द करण्यात आलेली नाही.अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार हा मुख्य सचिव समितीला असतो. सध्या तरी अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात कोणताही प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाणार प्रकल्पासंदर्भात राज्य आणि कोकणच्या हिताचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे ही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.