
मुंबई : नागरिकांना पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा देण्यासाठी पारित केलेल्या महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या बोधचिन्ह व ‘आपली सेवा आमचे कर्तव्य’ या घोषवाक्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. अधिसूचित न झालेल्या सगळ्याच सेवा ऑनलाईन करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमाला मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधिन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एसव्हीआर श्रीनिवास उपस्थित होते.मुख्यमंत्री म्हणाले, सेवा हमी कायदा पहिल्या कॅबिनेटमध्येच केला. या कायद्याने जनतेला पारदर्शक, गतिमान आणि कालबद्ध सेवा देण्याची जबाबदारी वाढली आहे. हे काम योग्य पद्धतीने होत आहे. या कायद्याचे बोधचिन्ह व घोषवाक्य सर्वोत्तम झाले आहे. सेवा हमी कायद्याचे पहिले आयुक्त श्री. क्षत्रिय चांगले काम करीत आहेत. जनतेला या कायद्याने त्वरित न्याय मिळवून देण्याचे काम सेवा हमी टीमने करावे, अशी अपेक्षाही फडणवीस यांनी व्यक्त केली.लोकसेवा हक्क कायद्याला अधिक लोकप्रिय करण्यासाठी बोधचिन्ह व घोषवाक्य तयार केले आहे. यासाठी नागरिकांच्या स्पर्धा घेण्यात आल्या, यात उत्कृष्ट बोधचिन्ह नरेश अग्रवाल तर उत्कृष्ट घोषवाक्य हेमंत कानडे यांनी तयार केले. या दोघांना प्रत्येकी 25 हजारांचे पारितोषिक देण्यात आले आहे. यावेळी त्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
राज्य सेवा हक्क कायद्याची माहिती
- सेवा प्राप्त करण्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही
- राज्यात २६ हजार आपले सरकार सेवा केंद्र
- आरटीएस महाराष्ट्र मोबाईल ॲप किंवा आपले सरकार पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा
- ३९ विभागांकडून ४९७ लोकसेवा अधिसूचित
- यातील ४०३ सेवासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा
- ५ कोटी ४२ लाख ७८ हजार सेवांसाठी अर्ज प्राप्त
- ५ कोटी २७ लाख ४६ हजार ६४७ अर्जाचा आतापर्यंत निपटारा
- या कायद्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
















