
रत्नागिरी : संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी रत्नागिरीचे ऍड. दीपक पटवर्धन यांची बिनविरोध निवड झाली आहे. दीपक पटवर्धन हे स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल संपूर्ण राज्यातून त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
राज्य फेडरेशनची धुरा सांभाळणारे कोकणामधून गेलेले ते पहिलेच अध्यक्ष आहेत.
यापूर्वीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्यामुळे पुढील १६ महिन्यांच्या कालावधीसाठी मध्यवर्ती निवडणूक घेण्यात आली होती. यात राज्यातून आलेल्या फेडरेशनच्या २१ संचालकांनी अॅड. दीपक पटवर्धन यांच्या कामाची दखल घेत, त्यांची बिनविरोध निवड केली. शनिवारी रत्नागिरीत त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.
दरम्यान फेडरेशनचं शिर्डीमध्ये प्रशिक्षण केंद्र सुरू आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या सर्व दूरच्या प्रदेशामध्ये प्रशिक्षण पोहोचवायचा असेल तर एक सेंट्रल प्रशिक्षण केंद्र आणि मग त्या अनुषंगाने काम करणारी विविध विभागामध्ये वेगवेगळी केंद्र असावीत अशा प्रकारची संकल्पना असून, ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचं ऍड पटवर्धन यांनी सांगितलं..
दरम्यान सध्याची युद्धजन्य परिस्थिती आणि इंधनाचे वाढते दर यामुळे अर्थव्यवस्थेसमोर आणि पर्यायाने पतसंस्थांसमोर नवीन आव्हाने उभी राहिली आहेत. अशा कठीण परिस्थितीत राज्यभरातील १९ हजार पतसंस्थांना योग्य मार्गदर्शन आणि नेतृत्व मिळाले आहे, असा विश्वास भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी यावेळी व्यक्त करत दीपक पटवर्धन यांचे अभिनंदन केलं आहे..















