डोंबिवली : भारतीय निवडणूक आयोगाने रविवारी लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करून आदर्श आचारसंहिता जाहीर केली. आदर्श आचारसंहितेच्या धोरणानुसार शहर आणि ग्रामीण भागातील रस्ते आणि चौकात उभारण्यात आलेल्या अनधिकृत राजकीय फलकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. त्या आदेशनुसार पालिका प्रशासनाने सोमवारी शहरातील सुमारे शंभर फलकावर कारवाई करून ते ताब्यात घेतले.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात या भागातील राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रस्ते, गल्लीबोळ, चौक, हमरस्ते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहानमोठे होर्डिंग उभारले होते.
भारतीय निवडणूक आयोगाने रविवारी आचारसंहिता जाहीर केल्यानंतर सोमवारी मात्र सरकारी यंत्रणा कामाला लागली. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक ठिकाणी लागलेले होर्डिंग, फलक, पताका, झेंडे सरसकट काढून टाकण्याची कार्यवाही सुरु केली. यासाठी आयुक्त गोविंद बोडके यांनी सर्व प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले.
पूर्वेकडील डोंबिवली विभागीय कार्यालयातील प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘फ’ व ‘ग’ प्रभाग अंतर्गत येणाऱ्या मानपाडा व रेल्वे स्थानक परिसर, फडकेरोड विभागातून सुमारे छोटे – मोठे एकूण 80 अनधिकृत फलकांवर कारवाई करून ताब्यात घेतले. तसेच पश्चिमकडील ‘ह’ प्रभागक्षेत्र अंतर्गत छोटे-मोठे असे 30 तर ग्रामीण विभागातून 130 अनधिकृत फलक काढण्यात आले आहेत.