नवी दिल्ली : अचलकुमार जोती यांनी देशाचे २१ वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून आज आपला कार्यभार स्वीकारला. मावळते आयुक्त डॉ.नसीम ज़ैदी काल सेवानिवृत्त झाले.
देशात मुक्त, निर्भय आणि विश्वासार्ह निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याची आयोगाची परंपरा यापुढेही कायम ठेवण्याला आपले प्राधान्य राहिल, असे जोती यांनी पदभार स्वीकारल्यावर सांगितले. तसेच एकही मतदार मतदानापासून वंचित राहता कामा नये, हे अभियानही पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.
विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीत जनतेचा अधिकाधिक सहभाग वाढावा, यासाठी ई-प्रशासनाला प्रोत्साहन देऊ, असेही ते म्हणाले.
जोती हे १३ मे २०१५ पासून निवडणूक आयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांच्या काळात विविध राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या. त्याआधी त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत सनदी अधिकारी म्हणून काम पाहिले असून, त्यांना ४२ वर्षांचा दीर्घ अनुभव आहे.