रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी)- मुंबई गोवा माहामार्गावरील खेड तालुक्यातल्या जगबूडी पुलानजिक टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातामध्ये दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. आज दुपारी दोनच्या सुमारास हि घटना घडली. दुचाकीला धडक देऊन टेम्पोवाल्याने टेम्पोसह पळ काढला. त्यानंतर घटनास्थळावरून अनेकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क करूनही पोलीस वेळेत आले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी महामार्ग रोखून धरला होता. त्यामुळे वाहतूक अर्धातास ठप्प होती.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार भरणे इथे राहणारे रवींद्र शिंदे आपल्या पत्नी आणि मुलांसह दुचाकीवरून वेरळच्या दिशेने इथे चालले होते. त्याचवेळी चिपळूणहून मुंबईच्या दिशेने चाललेल्या एका मालवाहू टेम्पोने एसटीला ओव्हरटेक करण्याच्या नादात शिंदे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये रवींद्र शिंदे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर त्यांचा मुलगा आयुष यालाही दुखापत झाली आहे. या अपघातानंतर टेम्पोचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी जगबुडी पुलाजवळ धाव घेतली. आणि स्थानिक आणि वाहनचालकांनी लगेचच पोलीस ठाण्याशी संपर्क केला, मात्र पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर असून देखील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ आणि वाहनचलकांनी दोन्ही बाजूंनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. तर काहींनी रवींद्र शिंदे यांना जवळच्या एसएमएस रुग्णालयात दाखल केले. दरम्यान घटनास्थळावरील ग्रामस्थानी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात दुपारी दोन वाजता झाला आणि हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असून देखील पोलीस पाऊण तासानंतर घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळेच ग्रामस्थ आणि वाहनचालकांनी महामार्ग रोखून धरला. पोलिसांच्या या वेळकाढूपणामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली.