रत्नागिरी, (आरकेजी) : चालकाला झोप अनावर झाल्याने त्याचे नियंत्रण सुटून एक तवेरा दरीत कोसळल्याची घटना आज पहाटे घडली.
मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतल्या निवळीजवळ हा अपघात झाला. यात दोन ठार तर पाचजण जखमी झाले. जखमींवर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने तवेरा गाडी येत होती. चालकाला झोप अनावर झाली आणि त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दरीत कोसळली. निवळी येथे ईश्वर ढाब्याजवळ पहाटे सव्वाचारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, त्यात गाडीतील दोन जण जागीच ठार झाले. रोहित जाधव व गीता मोरे अशी त्यांची नावे आहेत.
मुंबई गोवा महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. कोकणात येणारे पर्यटक तसेच चाकरमान्यांनी वाहने चालवताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.