रत्नागिरी : संगमेश्वर- देवरूख मार्गावरील साडवली येथे मॅक्झीमो आणि ऑटो रिक्षा यांच्यात आज भीषण अपघात झाला. यात रिक्षा चालक जागीच ठार होवून तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी दुपारी ३ च्या सुमारास घडली. साडवली वनाज कंपनीच्या नजीक हा अपघात घडला. अपघातात ऑटो रिक्षा चालक देवरूख येथील राजेंद्र उर्फ पप्या वेेल्हाळ हेे मृत झाले आहेत. वेल्हाळ हे आपल्या ताब्यातील रिक्षा (एमएच०८ ई ५५७७) घेवून संगमेश्वर रेल्वे स्टेशनला भाडे सोडून पुन्हा देवरूखकडे परतत असताना हा अपघात घडला. या रिक्षामध्ये संगमेश्वर येथे तीन प्रवासी देवरूखकडे येण्यासाठी रिक्षात बसले होते. यातील काही प्रवासी हे साडवली सह्याद्रीनगर येथील पेढांबकर यांच्या निवासस्थानी अंत्यविधीसाठी येत होते. तत्पुर्वीच २ किमी अंतरावरच या प्रवाशांना अपघातात जखमी व्हावे लागलेय संगमेश्वर -देवरूख अशी प्रवास करताना ही रिक्षा वनाज कंपनी जवळ आली असता समोरून येणाऱ्या मॅक्झीमोची समोरासमोर जोरदार धडक झाली. मॅक्झिमो (एमएच ०८ झेेड ९५०४) ही देवरूख शहरात पावाची विक्री करून पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूलच्या दोन विद्याथ्र्यांना घेवून सांगवेेकडे निघाली होती. मॅक्झीमोे ही सांगवेेतील देवेंद्र भास्कर शेलार यांची गाडी आहे. ही गाडी शेलार यांचा भाचा मयुरेश सरफरे हा चालवत होता. या गाडीमधून शेलार यांच्या घरातीलच दोन मुले नेहमीप्रमाणे घरी निघाली होती. मात्र ही गाडी साडवली येथे येताच संगमेश्वरहून देवरूखकडे येणाऱ्या रिक्षा यांच्यात जोराची धडक होवून अपघातात रिक्षाची पुढील बाजूचा चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचालक पप्या वेल्हाळ हे रिक्षातच अडकले.अपघाताची माहिती मिळताच उपस्थितांनी पप्या यांना बाहेर काढले. व उपचारासाठी तत्काळ देवरूख ग्रामीण रूग्णालयात वेल्हाळ व जखमींना दाखल केले. मात्र वेल्हाळ यांची तत्पुर्वीच प्राणज्योत मावळली. अपघाताचे वृत्त शहरात पसरताच देवरूख शहरातील रिक्षाचालकांनी वेल्हाळ यांना बघण्यासाठी ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली. जखमींवर देवरूख ग्रामीण रूग्णालयात उपचार करून तिघा गंभीर जखमींना अधिक उपचारा करिता रत्नागिरी येथे सुभाष तानाजी मेस्त्री व वसंत धोंडू कळंबटे (रा. परचुरी) व प्रविण जयपाल देसाई (वय ३१, रा. हातकणंगलेे, कोल्हापुर) यांना हलविण्यात आले आहे. तर मॅक्झीमो चालक मयुरेश सरफरे (२३) व हर्ष शेलार (९) यांच्यावर देवरूख ग्रामीण उपचार सुरू आहेत. देवरूख पोलिस ठाण्याचे पोलिस हे. कॉ. प्रशांत शिंदे व पोलिस कॉंन्स्टेबल संतोष सडकर यांनी पंचनामा केला.रात्री उशिरा राजेंद्र वेल्हाळ यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वेल्हाळ हे देवरूख मध्ये गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे रिक्षाचा व्यवसाय करत होते. त्यंाच्या अपघाती मृत्यूने देवरूखवासियांनी हळहळ व्यक्त केली. त्यांच्या अपघाती निधनाची वार्ता कळताच माजी आमदार सुभाष बने, जि. प. सदस्य रोहन बने, उपनगराध्यक्ष सुशांत मुळ्ये, रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष प्रमोद कदम, नगरसेवक संतोष केदारी, माजी जि. प. सदस्य दिलीप बोथले, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, नगरसेवक प्रकाश मोरे यांसह अनेक राजकिय, व्यापारी, रिक्षा चालक- मालक, एसटी प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी यांनी ग्रामीण रूग्णालयात धाव घेवून अंत्यदर्शन घेतले. व जखमींची विचारपुस केली.