रत्नागिरी, (आरकेजी) : मुंबई विद्यापीठाच्या विविध परिक्षांचा निकाल जाहीर होण्यास विलंब होत आहे. त्याचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज रत्नागिरीतल्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बाहेर कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली. आणि त्यांचे छायाचित्र फलकावर चिकटवत त्या समोर महाआरती ओवाळली.
मुंबई विद्यापिठाच्या निकालावरून राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेधनातही रणकंदन माजले आहे. निकालाबाबत निश्चित केलेली ३१ जुलैची संपून आता 5 ऑगस्ट ही तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे अभाविपच्या विद्यार्थ्यानी आज रत्नागिरीत आंदोलन केले. गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या बाहेर निकाल लवकर लागण्यासाठी कुलगुरुंची महाआरती केली गेली. कुलगुरूंच्या छायाचित्रासमोर कार्यकर्त्यांनी त्यांना निकाल जाहीर करण्यासाठी गार्हाणे घातले.