पुणे : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मानाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याच्या अभिजित कटकेने महाराष्ट्र केसरीची गदा आपल्या खांद्यावर घेतली. महाराष्ट्र केसरीची गदा कोण घेणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना डाव- प्रतिडावांची खेळी करीत पुण्याचा प्रतिभावान युवा मल्ल अभिजीत कटके याने प्रतिष्ठेच्या गदेवर आपले नाव कोरले. अभिजितने कुस्ती जिंकली असली तरी साताºयाच्या किरण भगतने महाराष्ट्राच्या तमाम जनतेची मने जिंकली.
समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भूगाव येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत झाली.
यावेळी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री गिरीष बापट, रामराजे नाईक निंबाळकर, राधाकृष्ण विखे पाटील, विश्वास नांगरे पाटील, मोहन जोशी, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, स्पर्धा संयोजन समितीचे शांताराम इंगवले, मुळशी तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष शिवाजी तांगडे, संदीप भोंडवे, स्वस्तिक चोंधे, राहुल शेडगे, अनिल पवार आदी यावेळी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, कुस्ती हा ऐतिहासिक खेळ असून याला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळत आहे. एवढया मोठया संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित असल्याने या खेळाचे महत्त्व वाढल्याचे दिसून आले आहे. शरद पवार म्हणाले, संपूर्ण हिंदुस्थानचे लक्ष महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडे असते. भूगावमध्ये झालेल्या या कुस्ती स्पर्धेला हजारोंची उपस्थिती असून यामुळे पैलवानांना प्रोत्साहन मिळणार आहे. अभिजीत काटकेला चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महिंद्रा थार ही गाडी बक्षीस स्वरुपात देण्यात आली. उपमहाराष्ट्र केसरी किरण भगतला बुलेट देऊन सन्मानित करण्यात आले.