रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): माजी राष्ट्रपती शास्त्रज्ञ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहण्यासाठी दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यालयाने अंतरिक्ष यानाच्या रांगोळीची प्रतिकृती रेखाटून अनोखी आदरांजली वाहीली. शनिवारी ११ ऑगस्ट रोजी दीपपूजनाच्या मुहुर्तावर दिव्यांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम घेतला होता. पारंपरिक दगडी दिवा, बत्ती, कंदील, बॅटरी, सौरदिप, समई, निरांजन असे पन्नासहून अधिक प्रकारचे दिव्यांची आरास प्रदर्शनात आकर्षकरीत्या मांडण्यात आली होती. संस्थेचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर, कार्याध्यक्ष अॅड. सुमिता भावे, उपाध्यक्ष अॅड. विनय आंबुलकर, सचिव दाक्षायणी बोपर्डीकर, अनुबंध शॉर्टफिल्मचे निर्माता, दिग्दर्शक अॅड. संकेत घाग, अभिनेते शेखर जोशी, सदस्य विशाखा भिडे, जयंत प्रभुदेसाई, उद्योजिका श्रीमती स्मिता परांजपे, मुख्याध्यापक विनोद नारकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व दीप मान्यवरांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आले. त्यानंतर देशकार्य करताना हुतात्मा झालेल्या मेजर कौस्तुभ राणे तसेच शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. नगरपरिषद पुरस्कृत लोकमान्य टिळक वक्तृत्व स्पर्धेतील विजेते निधी कदम, तपस्या बोरकर, आर्य दांडेकर, आदिती फडके, श्लोक दळी व पूर्वा जोशी यांचा सन्मान मान्यवरांनी केला. अनुबंध फिल्मला आंतरराष्ट्रीय पारितोषिक मिळाल्याबद्दल निर्माते अॅड. घाग, फिल्ममधील कलाकार शेखर जोशी व या शाळेतील विद्यार्थी वरद पाटणकर व स्मित पानगले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अॅड. घाग यांनी सत्काराबद्दल खूप समाधान व्यक्त केले. अॅड. परुळेकर यांनी, विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनातला दीप प्रज्वलित करून शाळा व देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक संघाच्या प्रतिनिधींनी मेहनत घेतली.