रामेश्वरम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामेश्वरम् येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम स्मारकाचे उद्घाटन केले. कलाम स्थळ येथे त्यांनी डॉ. कलाम यांच्या पुतळयाचे अनावरण केले आणि पुष्पांजली वाहिली; त्यानंतर पंतप्रधानांनी डॉ. कलाम यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधला.
पंतप्रधानांनी “कलाम संदेश वाहिनी” या प्रदर्शनी बस ला हिरवा कंदील दाखवला. ही बस देशभरातल्या विविध राज्यांमध्ये प्रवास करुन 15 ऑक्टोबर माजी राष्ट्रपती कलाम यांच्या जयंती दिनी नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन येथे पोहोचेल. मोठया जनसभेमध्ये पंतप्रधानांनी नील क्रांती योजनेंतर्गंत पात्र लाभार्थ्यांना मंजूरी पत्रे वितरीत केली.
मोदी यांनी त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून रामेश्वरम् ते अयोध्या या “श्रध्दा सेतू” नवीन एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी हरित रामेश्वरम् प्रकल्पाची रुपरेषा जारी केली. त्यांनी एनएच 87 वरील 9.5 किलोमीटरचा जोडरस्ता राष्ट्राला समर्पित केला. हा मार्ग मुकंन्दरायार छतिराम आणि अरीचलमलाई दरम्यान आहे.
जनसमुदायाला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, रामेश्वरम हे संपूर्ण देशासाठी आध्यत्मिक केंद्र आहे, आणि आता हे डॉ. कलाम यांच्यामुळे देखील ओळखले जाईल. डॉ. कलाम यांच्यामध्ये रामेश्वरमचा साधेपणा, खोली आणि शांतता दिसायची. हे स्मारक डॉ. कलाम यांचे जीवन आणि कार्यपध्दतीचे उत्तमरित्या प्रदर्शन घडविते असे पंतप्रधान म्हणाले.