
मुंबई, (विशेष प्रतिनिधी) : ‘मी दलित पँथर संघटनेमधून आलो आहे, त्यामुळे बिबट्या दत्तक घेणे म्हणजे दलित पँथर संघटनेविषयी प्रेम व्यक्त करण्याचा एक प्रयत्न असल्याचं, असे प्रतिपादन केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. बोरिवलीच्या संजय गांधी उद्यानातुन आठवले यांनी बिबट्या दत्तक घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
बिबट्याच नाव त्यांनी ‘ भीम’ ठेवले आहे. ‘ भीम’ हा सहा वर्षाचा आहे. त्यांनी हा बिबट्या मुलगा ‘जीत’ आठवलेच्या नावावर एका वर्षासाठी दत्तक घेतला आहे. त्यासाठी एक लाख २० हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये २०१३ पासून प्राण्यांना दत्तक घेण्याची योजना सुरु झाली. या योजनेत वन्य प्राण्याला एक वर्ष दत्तक घेऊन त्यांचा खर्च करता येतो.
या आधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी याच उद्यानातून वाघ दत्तक घेतला होता.
आठवले म्हणाले की ‘आधी टायगर आणि पँथरचे भांडण व्हायचे, मात्र आता टायगर आणि पँथर सोबत आहेत.’
प्राणीमात्रांवरही प्रेम केले पाहिजे असा उपदेश तथागत बुद्धांनी केला आहे. त्यानुसार बिबट्या दत्तक घेण्यात येणार आहे. हा बिबट्या शहापुर येथे एका नदित जखमी अवस्थेत सापडला होता. त्याची देखभाल आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात होत आहे. असे आठवले यावेळी म्हणाले