डोंबिवली , (प्रशांत जोशी) : आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवली आणि ग्रामीण विभागातील वैष्णवजनांनी स्थानिक विठ्ठल मंदिरात तसेच विविध ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण करत दर्शन घेतले. ग्रामदैवत असणाऱ्या गणपती मंदिरात नारायणाचा अवतार म्हणून मंदिरातील विठ्ठल मूर्तीची पुरूषसुक्त मंत्रांनी पंचामृती पूजा करण्यात आली.
हरिओम रेल्वे प्रवासी मंडळ, दिवा-डोंबिवली यांच्यातर्फे गेली सात वर्षे आषाढी एकादशी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यावर्षीही मंडळाने फलाट क्रमांक 1 वरील कल्याण दिशेच्या मोकळ्या जागेत भव्य सजावट करून विठ्ठलच्या मूर्तीचे पूजन केले. सकाळी 9.06 मिनिटांनी डोंबिवलीहून मुंबईसाठी सुटणाऱ्या लोकलमधील प्रवाशांचे हरि ओम रेल्वे प्रवासी मंडळ आहे. मंडळातर्फे तुळशीची पाने-फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली. प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षीही राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. नगरसेवक विसू पेडणेकर यांनीही दर्शनाचा लाभ घेतला. मंडळातील कार्यकर्त्याने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही प्रकारचा रेल्वे प्रशासन आणि प्रवाशांना त्रास न होता हा सोहळा केला जातो. पूर्वी सुरुवातीला फक्त दोन तासांचा कार्यक्रम केला होता पण नंतर भाक्तांच्या आग्रहाखातर आता पूर्ण दिवस कार्यक्रम आणि सायंकाळी आरती होते. दिवसभर शहरातील मंडळे विविध प्रकारची भजने सादर करतात. यामध्ये ‘विठ्ठल आवडे,’ ‘अवघे गर्जा पंढरपूर,’ ‘माझे माहेर पंढरी’ अशी भक्तिमय पांडुरंगाची भजने सादर करण्यात आली.
ग्रामीण विभागातील निळजे गावातील चरू नारायण पाटील यांचे स्मरणार्थ झिपा नारायण पाटील यांनी विठ्ठल-रखुमाईची मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिरात आज आषाढी एकादशीचे औचित्य साधून संगीतरत्न शंखुनाथबुवा पडघेकर यांची शिष्या शितल पाटील आणि प्रिती कांबळे यांच्या भक्तिमय संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडल यावेळी मुदुंगमणी प्रथमेश कांबळे यांनी त्यांना साथ दिली. मंदिरात दासबोध आणि ज्ञानेश्वरीचे पारायण आदी कार्यक्रम होतात अशी माहिती पाटील यांनी दिली.
पूर्वेकडील ग्रामदैवत असणाऱ्या गणपती मंदिरात विश्वस्त निलेश सावंत यांनी पांडुरंगाची पूजा सकाळी सहा वाजता केली. नेहमी गणपती अथर्वशीर्ष किंवा इतर मंत्रानी पूजा केली जाते. परंतु पांडुरंग हा नारायणाचा अवतार म्हणून पुरूषसुक्ताची आवर्तने करून पांडुरंगाची पंचामृती महापूजा आषाढी एकादशी मिमित्त केली जाते. मंदिरात अनेकजण अभिषेख करतात. कीर्तनकार ह.भ.प. ग्रद्रेबुवा यांचे आषाढी एकादशीचे कीर्तन झाले. यावेळी भारत विकास परिषद माध्यमातून 750 तुळशीरोपांचे वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे आयरे येथील विठ्ठल मंदिरात पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांनी यावेळी
विठ्ठल भक्तांना कापडी पिशवी आणि फळ वाटप केले. शहरात आषाढी एकादशी निमित शाळेतील मुलांनी विठ्ठलाच्या पालखीसह दिंडी काढुन पंढरपूर वारीचा आनंद घेतला.