डोंबिवली : कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत समाविष्ट झालेल्या त्या 27 गावांची सध्याची परिस्थिती अतिशय दयनिय झाली आहे. मुसळधार पावसामुळे आणि त्यातून निर्माण झालेल्या पुराची झळ सर्वच ग्रामीण आणि शहरी नागरिकांना बसली आहे. सखल भागात पाणी तुंबल्याने रोगराई पसरण्याची भिती निर्माण झाली आहे. यावर मात करण्यासाठी भव्य मोफत आरोग्य शिबीर आणि मोफत शस्त्रक्रिया शिबाराचे आयोजन शनिवारी केले होते.
पूर्वेकडील मानपाडा रोड, देसले पाडा येथील वरद वियानक सभागृहात माजी स्थायी समिती सभापती तथा जेष्ठ नगरसेवक रमेश सुकाऱ्या म्हात्रे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात मोठ्या आजारांवरील मोफत शस्त्रक्रिया आणि मोफत आरोग्य शिबीर असा दुग्ध शर्करा योग जुळवून आणला होता. सदर शिबिराचे उद्घाटन महापौर विनिता राणे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, जिल्हा महिला संघटक लताताई पाटील, ग्रामीण संघटक कविता गावंड आणि आयोजक रमेश म्हात्रे यांच्या हस्ते झाले.
सदर शिबिरात हृदयाची अँजिओपलास्टी, बायपास शस्त्रक्रिया, अन्न नलिका शस्त्रक्रिया, कँसर, शस्त्रक्रिया, किडनीचे आजार, गर्भ पिशवी दुरुस्ती, मणक्याची शस्त्रक्रिया अशा मोठ्या आजारांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गरजू रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांनी या शिबिराचे आयोजन करा अशी मागणी केली होती असे यावेळी रमेश म्हात्रे यांनी सांगितले. यावेळी शिबिरात येणाऱ्या नागरिकांना सुविधा मिळत आहेत का यावर लक्ष ठेवण्यात आले आणि त्याची प्रत्यक्ष पाहणी केली जात होती.
या भव्य शिबिरात मुकेश पाटील, प्रमिला पाटील, विवेक खांबकर, विकास देसले, सुनील मालवणकर, जयंता पाटील, आकाश देसले, उमेश पाटील यांच्यासह रघुवीरनगर येथील जेष्ठ नागरिक संघाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आरोग्य शिबिराचा फायदा त्यांच्या नागरिकांना मिळवून दिला.