रत्नागिरी (आरकेजी): बोरीवलीतील पाच जणांचा रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. केनेथ टिमोथी मास्टर्स (५६) मोनिका बेंटो डिसोझा (४४), सनोमी बेंटो डिसोझा (२२), रेंचर बेंटो डिसोझा (१९) आणि मैथ्यू बेंटो डिसोझा (१८, सर्व राहणार बोरीवली प.) अशी मृतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बोरीवली येथील डिसोझा आणि मास्टर्स कुटुुंब उन्हाळी सुट्टीनिमित्त पर्यटनासाठी रत्नागिरीत दाखल झाले होते. रविवारी दुपारी डिसोझा आणि मास्टर्स कुटुुंबातील सातजणांनी आरेवारे समुद्रकिनारा गाठला. या ठिकाणी मौजमजा करत असताना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सहाजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले. केवळ रिटा डिसुझा (७०) या पाण्याच्या भितीने पाण्यात उतरल्या नाहीत. त्यांनी काठावरच उभ राहणे पसंत केले. पाण्याला ओहोटी असल्याने सहाहीजण पाण्यात खेचले गेले. खाडी आणि समुद्राच्या मुखाजवळ पाण्याचा अंदाज न आल्याने सहाहीजण पाण्यात बुडू लागले. बुडणाऱ्या सर्वांनी जिवाच्या आकांताने आरडाओरड सुरू केली. आरडाओरड ऐकुन स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. यावेळी लिना केनेथ मास्टर यांच्या हाताला समुद्र किनाऱ्यानजिकचा दगड लागल्याने त्यांनी दगडाच्या मदतीने किनारा गाठत स्वत:चा जीव वाचवला. परंतु, उर्वरित पाच जण मात्र समुद्रात वाहुन गेले. स्थानिक पोलीस पाटील आदेश कदम, ग्रामस्थ सागर शिवलकर, विवेक कनगुटकर, जीवन मयेकर, रूपेश वारेकर, महेश वारेकर यांनी समुद्रात बेपत्ता झालेल्या पाचजणांची शोध मोहीम सुरू केली. परंतु, पाण्याला ओहोटी असल्याने पाचहीजणांचे मृतदेह समुद्रातील दगडांमध्ये फसले होते. स्थानिक तरूणांनी मोठ्या जिकीरीने एकएक मृतदेह बाहेर काढले. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर समुद्रात बुडालेले पाचही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या दुर्घटनेची माहिती मिळताच तहसिलदार मच्छिंद्र सुकटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासह पोलीस कर्मचारीदेखील तत्काळ मदतीसाठी दाखल झाले होते.