रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरीतल्या आरे समुद्रकिनारी झालेल्या घटनेनंतर आता पर्यटकांच्या सुरक्षेसाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे आरे इथे जीवरक्षक नेमण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
जिल्ह्यातील किनारा सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी आज तातडीची बैठक घेतली. या बैठकीत आरे येथे जीवरक्षक, वॉच टॉवर, सूर्यास्तानंतर पोचण्यास मनाई यासह बचावाची साहित्य ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील 14 बीच वर यापूर्वी जीवरक्षक नेमले आहेत. उर्वरित 17 बीचेसवरही अशाप्रकारची सुविधा दिली जाईल अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे यांनी दिली. तालुक्यातील आरे-वारे समुद्र किनारी बोरिवलीतील डिसोझा या एकाच कुटुंबातील 5 जणांचा रविवारी बुडून मृत्यू झाला. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद आणि ग्रामीण विकास विभागावर याची जबाबदारी टाकली आहे. कोकण पर्यटन विकासाच्या माध्यमातून त्यासाठी 54 लाख मंजूर आहेत. टेहेळणी मनोरे, लाइफ गार्ड, छोटी बोट आदी वस्तू देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त अन्य 17 बीच संरक्षित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. टेहेळणी मनोरे उभारणे, जीवरक्षक नेमणे, बुडणार्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी छोटी बोट घेणे, सेफ आणि डेंजर झोन तयार करणे, दोरी पासून अन्य साहित्याचा यामध्ये समोवश आहे.
दरम्यान आरे-वारे येथे ओहोटीच्यावेळी दुर्घटना घडतात; मात्र त्याची सखोल चौकशी करुन तांत्रिक अहवाल तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी मेरी टाईम बोर्ड आणि पोलीसांना दिले आहे.