रत्नागिरी, (विशेष प्रतिनिधी)- रत्नागिरी येथील आरे-वारे खाडीत पोहण्यासाठी उतरलेल्या पाच तरूणांपैकी एकाचा मृत्यू झाला असून चौघांना वाचविण्यात स्थानिक ग्रामस्थांना यश आले. दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सोमवारी खाडी किनारी आढळून आला.
पुण्यातील पाच तरुण फिरण्यासाठी येथे रत्नागिरीत फिरायला आले. अनंत गुडी, पंकज सिंग, विकास पटेल, अनुज सिंग परिहार आणि सुमंत शास्त्री अशी या तरुणांची नावे आहेत. हे पाच किनार्यावर फिरुन झाल्यानंतर आरे- वारे खाडीत पोहण्यासाठी उतरले. मात्र भरतीची वेळ असल्याने पाणी हळूहळू वाढू लागले. समुद्र आणि खाडीच्या मुखावर भोवरा तयार झाल्याने त्या तरुणांना पाण्याचा अंदाज आला नाही. यामुळे ते पाण्यात गटांगळ्या खावू लागले. किनार्यावरील नागरिकांनी त्यांना पाहिल्यानंतर तात्काळ बचावकार्य हाती घेत चौघांना वाचवले. मात्र अनुजसिंग खोल पाण्यात वाहून गेल्याने त्याला वाचविण्यास नागरिकांना अपयश आले. बाहेर काढलेल्या चौघांपैकी अनंतच्या पोटात पाणी गेल्यामुळे तो गंभीर अवस्थेत होता. त्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अनुजसिंग या तरुणाचा सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला असून याबाबतचा तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल विभूते करत आहेत.