रत्नागिरी (आरकेजी): मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ घाटामध्ये भरधाव जात असणारी खासगी आराम बस पलटूून झालेल्या अपघातात १६ प्रवासी जखमी होण्याची घटना आज पहाटेच्या दरम्यान घडली.
आरामबस अपघातात ऋषीकेश अरुण सुर्वे (२९,रा. परेल, मुंबई), पायल सिरोही (२६, रा. ठाणे, मुंबई), लक्षणा लखण ठेंबरे (२८, रा. कल्याण,मुंबई), पुर्णा चंद्रा शेट्टी (२८, रा. गोवा, मार्दल), जयंत तुकाराम राणे (५२, रा. कळवा, मुंबई), अमिंदरकुमार प्रकाश दळवी (२९, रा. परेल, मुंबई), अनिकेत शेखर आडवीलकर (२७, रा. परेल मुंबई), मकरंद कृष्णकांत पाटील (२८, रा. अलिबाग), हर्षल बाळकृष्ण जोशी (३०, रा. नवीमुंबई), नयना हर्षल जोशी (२६, रा. नवीमुंबई), सोनाली गणेश मडवी (२४, रा. नेरुळ, नवीमुंबई), आशिष प्रकाश विचारे (२७, रा. पेरल मुंबई), सिद्धेश प्रकाश विचारे (३०, रा. परेल, मुंबई), अमोल फकर परब (४०, रा. बोरीवली मुंबई), रेश्मा अमोल परब (३६, रा. बोरीवली मुंंबई), सिद्धेश सतिश जाधव (२९, रा. पेरल मुंबई) असे एकुण १६ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत़ जखमींवर लांजा येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करुन त्यांना सोडण्यात आले. मुंबई गोवा महामार्गावर घडलेल्या आराम बस अपघाताबाबत लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अे के बी ट्रॅव्हल्सची आराम बस (एम एच-०७, सी-९६२७) गोव्याहुन मुंबईच्या दिशेने जात असतानाच मुंबई-गोवा महामार्गावरील लांजा तालुक्यातील वेरळ घाटाच्या तीव्र उतारावर आराम बस सोमावारी पहाटे ५.१५ वाजण्याच्या दरम्यान आली असता भरधाव असणाऱ्या बसवरील चालक पप्पू खान याचा ताबा सुटला. त्यामुळे बस महामार्गाच्या डाव्या बाजुला असणाऱ्या लोखंडी संरक्षक भिंतीवर जाऊन, जोरदारपणे धडकली. बसची धडक एवढी जबर होती की, बस पलटी होऊन उतारावराच्या दिशेने दहा ते पंधरा फुट घसरत गेली व संरक्षक भिंतीवर जाऊन थांबली. बस पलटी झाल्याने प्रवाशांच्या काळजाचा ठेकाच चुकला होता. बस संरक्षक भिंतीला अडकल्याने, बसचा अर्धा भाग दरीकडे झुकला होता, तर मागील भाग गटारामध्ये राहीला होता. लोखंडी संरक्षक भिंत असल्याने सुदैवाने बस दरीत कोसळता कोसळता बचावली आणि जिवीत हानी टळली. अपघाताची खबर मिळताच लांजा पोलिस स्थानकाचे पंडीत पाटील, संतोष झापडेकर, सुरेश शिरगावकर, सुनिल चवेकर, पांडूरंग किल्लर, धनाजी सुतार, राजेश पवार,संजय मुरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन, जखमी प्रवाशांना उपचारासाठी लांजा ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले़ उपचार केल्यानंतर जखमींना सोडून देण्यात आले़ अपघाताची माहिती मिळताच देवधे, वेरळ व लांजा शहरातील युवकांनी धाव धेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदतकार्य केले. कलंडलेली आराम बस क्रेनच्या सहाय्याने काढताना मुंबई-गोवा महामार्ग ३ तास ठप्प झाला होता. त्यामुळे वाहनांच्या रांगांच रांगा महामार्गावर लागल्या होत्या.