रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी येथील एस.पी. हेगशेट्ये महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. वाड्मय मंडळ विभागाचा उद्घाटन सोहळादेखील यावेळी पार पडला. अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन २०१८ चा मराठी साहित्यचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक नवनाथ गोरे, चेअरमन अभिजित हेगशेट्ये यावेळी उपस्थित होते . अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. लेखक नवनाथ गोरे व संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रमुख पाहुणे ‘फेसाटी’ कार नवनाथ गोरे म्हणाले, आपण आपल्या जिवनात कोणतीही गोष्ट साध्य करु शकतो. विद्यार्थ्यानी जिद्द चिकाटी बाळगायला हवी. ‘लेखक व कादंबरीनिर्मिती’ या विषयांवर आपल्या सृजनशीलतेची उदाहरण देत मार्गदर्शन केले. गोरे यांच्या कादंबरीला सन २०१८ चा मराठी साहित्यचा युवा साहित्य आकादमी पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. चेअरमन अभिजित हेगशेट्ये आपल्या मनोगतातून अण्णाभाऊ हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत कसे सक्रिय होते व त्यांची साहित्य निर्मिती, सर्वसामान्य व वंचितांविषयीची तळमळ या विषयी प्रतिपादन केले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य सुकुमार शिंदे यानी अण्णाभाऊ साठे यांचा कौटुंबिक व साहित्यिक परिचय करुन दिला. मराठी साहित्यात प्रचंड साहित्य निर्मिती करुनही त्यांच्या लेखनाची दखल घेतली गेली नाही याबद्दल खंत व्यक्त केली. विद्यार्थिनी अश्विनी कांबळे हिने अण्णा भाऊ साठे यांची ‘माझी मैना गावाकडं राहीली’ प्रसिद्ध गीत सादर केले. अर्चना परीट यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित राहीले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा कांबळे, प्रास्ताविक प्रा. सचिन टेकाळे तर आभार प्रा. स्मिता अांबेकर यानी मानले.