मालाड, (निसार अली) : महामारीविरोधात लढण्याची जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर कोरोनावर मात करता येऊ शकते, हे मालवणी-म्हाडा परिसरात राहणार्या 82 वर्षीय आजोबा, 76 वर्षीय आजी यांनी दाखवून दिले आहे. कोरोना झाल्यास घाबरून जाऊ नका, सरकारच्या सूचनेचे पालन करा, योग्य ती काळजी घ्या, आजाराविरोधात लढा, आम्ही या वयात लढलो आणि जिंकलो तर तुम्ही का नाही, असा संदेशच या आजी-आजोबांनी दिला आहे. आजी आजोबांच्या या खंबीर वृत्तीने हजारो कोरोना रुग्णांना या आजाराविरोधात लढण्याची प्रेरणा मिळाली आहे.
6 एप्रिल रोजी हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने आजोबांना मालाडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. कोरोना चाचणी केल्यावर ती पॉझिटिव्ह आल्याने कुटुंबिय हादरले. त्यांची 76 वर्षीय पत्नी आणि 15 वर्षीय नातूही कोरोनाबाधित आढळले. कुटुंबातील इतर तीन सदस्य निगेटिव्ह आले. त्यांना होम क्वारनटाईन केले.
आजी, आजोबा, नातवाला सेव्हन हिल रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना ते डगमगले नाहीत. उपचारांना व्यवस्थित प्रतिसाद दिला. यानंतर त्यांची पुन्हा कोविड 19 चाचणी झाली. औषधोपचार आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ती निगेटिव्ह आली. त्यांना घरी जाऊ देण्यात आले. अखेर कोरोना विरोधातील लढाई आजी-आजोबा-नातू जिंकले.