आजच्या मराठी तरुणाईला भुरळ घालणारे मराठमोळे ‘रॅप’सॉंंग’ ‘आम्ही पुणेरी…’ हे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गायक श्रेयस जाधव याने ते गायले आहे. नुकतेच हे रॅपसॉंंग सोशल मिडीयावर लॉंच करण्यात आले.
श्रेयसने यापूर्वी ऑनलाईन बिनलाईन’ सिनेमातील ‘ओ हो काय झालं’ या हरिहरन आणि लेसली लुईस यांच्या गाण्यामध्ये गायन केले होते. विशेष म्हणजे मराठी-हिंदी फ्युजन असलेल्या या गाण्याला आणि त्याच्या या रॅपला लोकांनी चांगला प्रतिसाद देखील दिला होता. श्रेयसचे नवे गाणं पुण्याबद्दल असून यात पुणेरी वैशिष्ट्यांचा उल्लेख तर आहेच पण त्यासोबतच प्रसिध्द शनिवारवाड्याचे भव्य दिव्य रूपही यात पाहायला मिळणार आहे.
या गाण्याचे बोल वैभव जोशी यांनी लिहिले आहे, तसेच हृषीकेश, सौरभ आणि जसराज यांचे संगीत लाभले आहे. एव्हरेस्ट इंटरटेनमेन्ट आणि गणराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली प्रसिद्ध होणारे हे पुणेरी रॅप मराठी संगीतक्षेत्राला महत्वाचे वळण देणारे ठरणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईला हे गाणे ठेका धरण्यास भाग पाडेल, असा विश्वास श्रेयसने व्यक्त केला आहे.