रत्नागिरी (आरकेजी): राजापूर-लांजा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार राजन साळवी यांच्यासह ३२ शिवसैनिकांना राजापूर पोलिसांनी अटक केली. मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.
राजापूर तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून काही किलोमीटर अंतरावर सध्या येऊ घातलेल्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. मनाई आदेशाचा भंग करून रिफायनरी विरोधात निदर्शने करून सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळल्याप्रकरणी आज राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजनजी साळवी यांच्यासह एकूण ३३ शिवसैनिकांना राजापूर पोलिसांनी अटक केली. आमदार साळवी आणि शिवसैनिकांना केलेल्या या अटकेमुळे रिफायनरी प्रकल्पविरोधी संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत. त्यातच २३ एप्रिल रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे नाणार दौऱ्यावर रिफायनरी विरोधासाठी जनतेची भेट देणार आहेत. यामुळे शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन अधिक तीव्र करण्याची शक्यता आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकांमध्ये प्रामुख्याने राजापूर शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, रिफायनरी विरोधी समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, राजापूर पं. स. सभापती सुभाष गुरव, राजापूर शहरप्रमुख संजय पवार, सागवे येथील शिवसेना विभागप्रमुख राजा काजवे, माजी जि. प. सदस्य अजित नारकर, तारळ गावचे सरपंच बाळकृष्ण हळदणकर यांच्यासह एकूण ३३ शिवसैनिकांचा समावेश आहे.