मालाड, ता.28(वार्ताहर) : “आमचं भांडुप, आमची जबाबदारी” या ईशान्य मुंबई जिल्हा जनता दलाने सुरू केलेल्या अभियानाच्या धर्तीवर पाऊल टाकत मुंबई युवा जनता दलाने चारकोप विधानसभा मतदारसंघाच्या परिसरात “आमचं चारकोप, आमची जबाबदारी“ हे अभियान सुरू केले आहे. राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बळावत चालली असताना, चारकोपमध्ये कोरोनाचा पुन्हा फैलाव होऊ नये यासाठी युवा जनता दलाचे अध्यक्ष केतन कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी चारकोप परिसरात 25 ते 27 जून अशी तीन दिवसांची निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली.या मोहिमेची सुरुवात चैतवन सांस्कृतिक केंद्र व बुद्ध विहारापासून करण्यात आली. या ठिकाणी सॅनिटायझरची फवारणी करण्यात आली.
यावेळी जेतवन सांस्कृतिक केंद्राचे सचिव राजेंद्र सैंदाणे उपस्थित होते. याच पद्धतीने ओंकारेश्वर मंदिर, जैन मंदिर, गणेश मंदिर या ठिकाणीही फवारणी करून निर्जनतुकीकरण करण्यात आले. युवा जनता दलाचे मुंबई अध्यक्ष केतन कदम यांच्या बरोबरच उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष किरण बागुल, चारकोप संघटक ॲड. आदित्य साळवे तसेच राहुल प्रधान, निशांत जाधव, सुधीर यादव, सुरेंद्र मनोहर, जयंतीभाई आदी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.
शनिवार 26 जून रोजी चारकोप पोलिस ठाण्यांमध्ये फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. तर रविवारी एमएचबी काॅलनी पोलिस ठाण्यांमध्ये तेथील अधिकाऱ्यांच्या संमतीने फवारणी करण्यात आली.
आता या परिसरातील सोसायट्यांमध्ये निर्जंतुकीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. युवा जनता दलाच्या या मोहिमेची माहिती मिळाल्यामुळे परिसरातील अनेक सोसायट्यांकडून आपापल्या वस्तीत निर्जंतुकीकरण करून देण्यासाठी युवा जनता दलाकडे विनंती पत्रे देण्यात येत आहेत.
याच बरोबर पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांना संघटित करण्याचा निर्णय पक्षाने घेतली असून याबाबतची पहिली बैठक जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.














