मुंबई, दि. १५ : कोरोनाची साथ ओसरू लागली असताना, एकही पेशंट राहू नये आणि पुन्हा साथीच्या उद्भवाला कारणीभूत ठरू नये यासाठी ईशान्य मुंबई जनता दलातर्फे भांडूप पश्चिम भागातील झोपडपट्ट्यांमध्ये घरोघरी जाऊन रुग्ण तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
एक टीम लीडर आणि चार कार्यकर्ते अशा पाच जणांचा सहभाग असलेल्या पाच टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीमकडे, ताप आहे का हे तपासण्यासाठी थर्मल गन, तसेच आॅक्सिजनची पातळी मोजण्यासाठी आॅक्सीमिटर देण्यात आला आहे. वस्तीतील प्रत्येक घरी जाऊन घरात उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीची या पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे. एखादी व्यक्ती तापाने आजारी असल्याचे आढळल्यास त्यांना कोरोना चाचणी करून घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे. गरज भासल्यास आजारी व्यक्तीला महापालिका वा शासकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठी सहकार्यही करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर प्रत्येक कुटुंबाला मास्क व सॅनिटाइजरचे वाटप करण्यात येत आहे. भांडुपमध्ये एकही छुपा रुग्ण राहू नये, ज्यामुळे पुन्हा साथ पसरण्याचा धोका निर्माण होईल, असा या मोहिमेच्या माध्यमातून प्रयत्न असल्याचे ही माहिती देताना ईशान्य मुंबई जिल्हा जनता दलाचे अध्यक्ष संजीवकुमार सदानंद यांनी सांगितले.
प्रवीण क्रॅस्टो, शुभम पवार, अॅन्थनी दास, धोंडीराज, जमीलभाई यांच्या नेतृत्वाखाली या पाच टीम कार्यरत करण्यात आल्या आहेत.
जनता दलाकडून मदतीचा ओघ…
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आणि ही काम करण्याची संधी समजून ईशान्य मुंबई जनता दलाचे अध्यक्ष संजीवकुमार आणि त्यांचे सहकारी कामाला लागले.
लाॅकडाऊनमुळे घरात बसून रहावे लागल्याने हातावर पोट असलेल्या सर्वांचीच दमछाक झाली होती.
गाठीशी असलेला थोडाबहुत पैसा थोड्याच दिवसांत संपत आला आणि अनेकांच्या मनात उपासमारीची भीती डोकावू लागली होती. अर्थात सगळीकडेच ही परिस्थिती होती.
अंधाऱ्या गुहेतून जाताना प्रकाशाचा किरण दिसूच नये आणि हा प्रवास असाच सुरू राहणार की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती होती. परंतु, या अंधाऱ्या वाटेवर असतानाच कुणाचा तरी आश्वासक हात मदतीसाठी पुढे यावा, तसे जनता दलाने भांडुपमध्ये सुरू केले.
लाॅकडाऊन सुरू झाल्यापासूनच संजीवकुमार सदानंद यांनी आपले सहकारी मलिका दुराई, प्रवीण क्रेस्टो, रिक्षा युनियनचे धोंडीराज, शिवकुमार, अॅन्थनी दास, मिहीर, कार्तिक कोनार, आदींच्या मदतीने गरजू आणि गरिबांना मदतीचा हात द्यायला सुरुवात केली. तीन महिन्यांहून अधिक काळ हे मदत वाटप सुरू होते. जवळपास दोन हजार कुटुंबांना या काळात शिधावाटप करण्यात आले. या शिवाय हातावर पोट असणाऱ्या आणि स्वतःचे घर नसल्याने कामाच्या ठिकाणीच राहणाऱ्या चारशेहून अधिक लोकांना १५ दिवसातून अधिक काळ तयार जेवण देण्यात येत होते.
याशिवाय पहिल्या लाटेच्या काळात अडीच हजारांहून अधिक कुटुंबाना अार्सेनिक अल्बमच्या गोळ्या, तसेच सॅनिटाइजर आणि अतिशय चांगल्या गुणवत्तेच्या पाच हजाराहून अधिक मास्कचे आतापर्यंत वाटप करण्यात आले. तसेच तीन वेळा आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात आली होती. याशिवाय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन सार्वजनिक ठिकाणे, चिंचोळ्या गल्या शौचालये अशा ठिकाणी फवारणी करून निर्जंतुकीकरणाचे काम केले.
या सगळ्याची परिणती म्हणजे गेल्या वर्षभरात भांडूप पश्चिम भागात तीनशेहून अधिक कार्यकर्त्यांची जनता दलाची टीम तयार झाली आहे.
साथी संजीवकुमार, त्यांचे सहकारी मल्लिका दुराई मॅडम, प्रवीण क्रॅस्टो, शुभम पवार, रिक्षा युनियनचे धोंडीराज, जमीलभाई आणि इतर कार्यकर्त्यांचे मुंबई जनता दलाच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर नारकर, कार्याध्यक्ष सलीम भाटी तसेच ज्योती बेडेकर, अपर्णा दळवी, अॅड. स्मृती जाधव, मतीन खान, संदेश गायकवाड यांनी
अभिनंदन केले अाहे. अशा पद्धतीने काम केल्यास हर घर जनता दल अशी परिस्थिती मुंबईत निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.