रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): रत्नागिरीत कातळावरील आंबा कलमे सध्या मोहरली असून, एक दिलासादायक चित्र सध्या कोकणात पहायला मिळत आहे. पण ह्या सगळ्या आंब्याच्या प्रक्रियेला निसर्गाने देखील साथ देणे गरजेचं असल्याचं मत इथले आंबा बागायतदार सांगत आहेत.
यावर्षी परतीच्या पावसाचा जोर उशिरापर्यंत होता; मात्र दिवाळीच्या तोंडावर विश्रांती घेतल्याने धास्तावलेल्या बागायतदारांना दिलासा मिळाला आहे. कारण ऑक्टोबर हीटमुळे जिल्ह्यातील काही बागांमधील कलमांना मोहोर येण्यास सुरवात झाली आहे. खास करून कातळावरील बागांमध्ये याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हे संकेत यावर्षी हंगाम चांगला येण्याचे आहेत, असा अंदाज बागायतदारांकडून वर्तविला जात आहे. परंतू भविष्यात वातावरणाची साथ मिळाली पाहिजे असं बागायतदार सांगत आहेत.
सप्टेंबर अखेरीस आणि ऑक्टोबरच्या सुरवातीला पावसाने जोरदार दणका दिला त्यानंतर दिवसभर चांगले ऊन पडत आहे. आंबा बागांच्या मुळातील पाणी उष्णतेमुळे लवकर मुरले. त्यामुळे पालवी लवकर येऊन मोहोराची फूट होईल. खूप सूर्यप्रकाश असेल तर कातळातील झाडांच्या मुळातील पाण्याचा लवकर निचरा होतो. ही प्रक्रिया वेगाने होण्यासाठी उत्तरेकडील बोचरे वारे सुरू होणे आवश्यक आहेत. हे वातावरण समाधानकारक राहिले तरच त्याचा फायदा आंबा हंगामाला नक्कीच होतो. दरवर्षी कोकणात डिसेंबरपर्यंत कलमांना मोहर येण्यास सुरूवात होते पण यावर्षी चक्क ऑक्टोबरमध्येच मोहर आला आहे. तसेच ज्या कलमांना मोहर अद्याप आलेला नाही त्या कलमांना पालवी उशिरा आली तर मात्र आंबा उशिरा येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.














