मुंबई : राज्यात उत्पादित होणाऱ्या हापूस व केशर आंब्यास जागतिक बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी आहे. निर्यात होणाऱ्या देशांमध्ये असलेल्या प्रोटोकॉल नुसार राज्यात उपलब्ध असलेल्या व्हेपर हीट ट्रिटमेंट सुविधा, विकीरण सुविधा रत्नागिरी व गोरेगांव येथील आंबा निर्यात सुविधा केंद्रात अद्ययावत करुन घेण्यात आल्या. निर्यातदारांची मागणी विचारात घेऊन विकीरण सुविधेची क्षमता वाढवून घेण्यात आली. त्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट आंबा निर्यात झाल्याची माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली.
यावर्षी अमेरिकेत गेल्या वर्षीच्या एकूण ७५० मे. टनाच्या तुलनेत ११०० मे. टन आंबा यशस्वीरित्या निर्यात करण्यात आला. यामध्ये सुमारे ६ ते ७ नविन निर्यातदारांनी संधीचा लाभ घेतला आहे. पणन मंडळाचे वाशी येथील विकिरण सुविधा केंद्रावरुन गेल्या वर्षीच्या १९० मे. टनाच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त म्हणजेच ४३५ मे. टन आंबा प्रक्रिया करुन अमेरीका येथे निर्यात करण्यात आलेला आहे. यामध्ये अमेरिकेतील १५ पोर्टद्वारे बहुतांश राज्यात निर्यात करण्यात आलेला आहे.
ऑस्ट्रेलिया सारखी शाश्वत बाजारपेठ देखील सहकार मंत्री यांच्या पाठपुराव्याने या हंगामामध्ये खुली झाली. पहिल्याच वर्षी सुमारे 43 मे. टन आंबा विकिरण प्रक्रिया करुन निर्यात कऱण्यात आलेला आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियामधील तीनही प्रमुख बाजारपेठात (मेलबर्न, ब्रिस्बेन, सिडनी) राज्यातील आंबा निर्यात झालेला आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रतिसाद न मिळालेले परंतू राज्यातील आंब्यासाठी महत्वाची असणारी जपान बाजारपेठ देखील काबीज करण्याच्या जपानच्या क्वारंटाईन निरीक्षकांना पणन मंडळाच्या व्ही. एच. टी. सुविधेवर आणून सुमारे १२ मे. टन आंबा जपानच्या बाजारपेठेत निर्यात करण्यात आला. कोरियाच्या मोठ्या बाजारपेठेत भारतीय आंब्याला वाव मिळावा यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना सहकार मंत्री यांनी केल्या होत्या त्यानुसार व्ही. एच. टी. येथे कोरियासाठीची सुविधा अद्यायावत करण्यात आली. विशेष उल्लेखनीय म्हणजे पहिल्याच वर्षी कोरिया येथे ४५ मे. टन आंबा निर्यात करण्यात आला.
‘मॅंगोनेट’ अंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांचाच माल निर्यातीकरीता वापरण्यात येतो. याद्वारे शेतकऱ्यांचा माल त्याच्या शेतावरुनच निर्यातदार खरेदी करतात व पर्यायाने शेतकऱ्याच्या मालास चांगला दर प्राप्त होत आहे.