
रत्नागिरी : रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीच्या ध्वनीमुद्रीकचे प्रकाशन नुकतेच झाले. त्यामुळे आता देवीचा महिमा गीतांच्या स्वरूपात महाराष्ट्रातच नवे तर संपूर्ण देशात देवीच्या भक्तांना ऐकावयास मिळणार आहे.
श्री देवी भगवतीच्या शिमगोत्सवाला प्रारंभ झाला. रत्नागिरीची माऊली आई भगवती या नावाने तयार करण्यात आलेल्या ध्वनीमुद्रीकचा प्रकाशन सोहळा मंदिर जिर्णोद्धार समितीचे सदस्य राजाभाऊ लिमये आणि शास्त्रीय संगीत गायिका मुग्धा भट-सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर मोंडकर, उपाध्यक्ष भाई सारंग, सचिव प्रकाश कीर, रमेश दळवी, सुरेश निकम, अभय सावंत, मंगेश हरम, गीतकार व गायक संदेश नागवेकर उपस्थित होते.
अध्यक्ष सुधाकर मोडकर यांनी देवस्थानच्या विविध कार्याचा आढावा घेऊन देवीच्या गीतांची सीडी सर्वांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे सांगितले. रत्नागिरीची माऊली आई भगवती ही सीडी भाविकांना नक्कीच आवडेल, असा विश्वास गायिका मुग्धा भट-सामंत यांनी व्यक्त केला. गायक संदेश नागवेकर यांनी सीडीमध्ये गाण्याची संधी दिल्याबद्दल देवस्थानचे आभार मानले. राजाभाऊ लिमये यांनी मंदिराच्या वाढत चालेल्या प्रसिद्धीचे आणि कार्याचे कौतुक करून देवस्थानाच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. ही ध्वनीमुद्रीका बनविण्यासाठी संदेश नागवेकर, अभिजित तथा मनू गुरव, उदयराज सावंत आणि अवधूत चव्हाण यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल देवस्थानच्यावतीने त्यांचा सन्मान केला. या वेळी देवस्थानचे मानकरी, विश्वस्त आणि उत्सव कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन नीलेश जगताप यांनी केले. आभार देवस्थानचे उपाध्यक्ष भाई सारंग यांनी मानले.















