डोंबिवली, (प्रशांत जोशी) : कोणताही राजकीय फायदा नसताना गेली 27 वर्ष समाज उन्नतीचे काम आगरी युथ फोरम करीत आहे. अखिल भारतीय आगरी महोत्सव आणि 90 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आदी सोहळ्यामुळे समाजाच्या तसेच शहराच्या नावलौकिकात भर पडली. आगरी युथ फोरम करीत असलेल्या समाज उन्नतीच्या कार्याची कल्पना आता रायगड जिल्ह्यात नेणार आहे असे प्रतिपादन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीत केले.
आगरी युथ फोरम तर्फे डोंबिवलीतील शहरी व ग्रामीण विभागातील 10वी उत्तीर्ण विद्यार्थी, पदविका, पद्वीधारण करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या गुणवंतांचा आणि विविध शैक्षणिक संस्थांचे संस्थाचालक, अध्यक्ष, मुख्याध्यापक यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम पूर्वेकडील होरायझोन सभागृह संपन्न झाला त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्यमंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिक्षक आमदार बाळाराम पाटील, माजी आमदार रमेश पाटील, ठाणे महापालिकेचे माजी स्थायी समिती सदस्य गोवर्धन भगत, संघर्ष समितीच सरचिटणीस चंद्रकात पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
चव्हाण पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनो शिक्षण अर्धवट सोडू नका, आपले पालक आपल्यासाठी त्याग करतात काबाड कष्ट करत राब राब राबतात त्यांना आणि आपल्या गुरूंना विसरता कामा नये. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगले मित्र असणे गरजेचे आहे. डोंबिवली ही शैक्षणिक हब सिटी व्हावी यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजचे आहे. डोंबिवलीत नर्सिंग कॉलेज असणे खुप आवश्यक असून लवकरच फिजियो थेरीपी कॉलेज सुरु होणार आहे.