डोंबिवली : आगरी युथ फोरम आणि सुभेदारवाडा कट्टा कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्यांचे प्रदर्शन आणि विक्री उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महिलांनी रानभाजांचे विविध प्रकार पाहून स्वतः भाजी-भाकरीचा मनोसक्त आनंद घेतला. आदिवासी महिलांची जीवन पद्धती आणि रान-भाजी विषयक विस्तृत माहिती यावेळी रानभाज्या अभ्यासक व श्रमिक मुक्ती संघटनेच्या अॅड. इंदवी तुळपुळे यांनी दिली. त्या विशेष आमंत्रित म्हणून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर महापौर विनिता राणे, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो, वैद्य विनय वेलणकर, मसापचे उपाध्यक्ष सुरेश देशपांडे, सुभेदारवाडा कट्टय़ाचे दिपक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी तुळपुळे यांनी सांगितले कि, वाडी-वाडीतल्या आदिवासी महिला रानभाज्या वेचून आणतात. तेल, मीठ, मिरची, कांदा, लसूण असे अगदी मोजकेच पदार्थ वापरून केलेल्या पाककृती इतक्या चविष्ट आणि पोषक असतात. त्यांचा आस्वाद डोंबिवलीकरांनी घ्यावा यासाठी आदिवासी महिलांनी भाजी आणि भाकरी बनवून आणली आहे त्याचा आस्वाद घ्या.
रानभाज्या अभ्यासक व श्रमिक मुक्ती संघटनेच्या अॅड. इंदवी तुळपुळे म्हणाल्या, सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, स्थानिक पातळीवरील बचत गटाकडून मध्यान्ह भोजन शालेय विद्यार्थ्यांना पुरवण्यात यावे. त्यामुळे चौकस आहार आरोग्यासाठी देणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला लाभ होऊ शकतो. मोहाच्या फुलापासून होणारे लाडू मध्यान्ह भोजनासाठी उपयुक्त आहेत.
यावेळी महापौर राणे म्हणाल्या, डोंबिवलीत रानभाज्यांचे प्रदर्शनात लोकांना याची माहिती मिळाली. यात प्रदर्शनात विविध औषधी रानभाज्या आहेत. तर वैद्य विनय वेलणकर यांनी ऋतूत जे पदार्थ मिळतात त्यांचे सेवन केले पाहिजे. या पदार्थाच्या सेवनाने शरीराला कोणताही अपाय होत नाही. शिवाय अनेक आजारावर ते गुणकारी आहेत. रानकेळ्य़ाची भाजी ही मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी आहे. टाकळा ही भाजी सोरायसिस या आजारावर उपयुक्त आहे. रानभाज्यामधील भाज्या या रक्तशुध्दीसाठी वापरल्या जातात असे सांगितले.