
रत्नागिरी, (आरकेजी) : जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये आज दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळाला. श्रीकृष्ण आणि राधेच्या वेषात अनेक बालगोपाळ सजून आले होते.
आगाशे विद्यामंदिरात दहीहंडीचा जल्लोष
दहिहंडीच्या गीतांवर आधारित नृत्य, पाण्यात भिजणारे बालगोविंदा आणि अपूर्व उत्साहात फोडलेली हंडी अशा वातावरणात सोमवारी सकाळी कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरात दहीहंडीचा जल्लोष झाला.
शाळेतील 650 विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी तसेच शिक्षकांनी या उत्सवात सक्रिय सहभाग घेतला. नटून थटून आलेल्या गवळणी, टिपरी नृत्य आणि बालगोविंदांनी दहीहंडीचा सण साजरा केला. मुख्याध्यापिका शीतल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षिका, शिक्षक आणि पालकांनी या कार्यक्रमाचे सुरेख नियोजन केले. प्रत्येक वर्गाच्या विद्यार्थ्यांनी कृष्णगीतांवर नृत्य केले.
आनंदीबाई अभ्यंकर बालमंदिरात बालगोविंदाची दहीहंडी
रत्नागिरीतील दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई परशुराम अभ्यंकर बालकमंदिरामध्ये फेर धरून टिपरी नृत्य सादर करत व गोविंदाच्या तालावर बालगोविदांनी हंडी फोडली. हा सोहळा पाहण्यासाठी पालक, नागरिकांची गर्दी झाली होती.
शाळेचे व्यवस्थापक गोगटे व मुख्याध्यापिका मीना रिसबूड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली ही दहीहंडीचा कार्यक्रम जल्लोषात झाला. यावेळी शाळेतील खेळघर, छोटा शिशू, मोठा शिशू गटातील तीनशे बालगोपाळांनी हंडीचा आनंद लुटला. कृष्ण व राधेच्या वेशभूषेतील बालदोस्तांसह नटून थटून आलेल्या मुलांनी कृष्णगीतांवर नृत्य केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेतही बालगोपाळांचा जल्लोष
दहीहंडीच्या निमित्ताने सावर्डेतील सह्याद्री शिक्षण संथेच्या प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी दहीहंडी बांधण्यात आली. या दहीहंडीत बाळगोपाळानी गणगौळण सादर केली. तर काहीजण श्रीकृष्ण राधेचा वेष परीधान करून यात बालगोपाल सहभागी झाले.
दहीहंडी गाण्यावर नृत्य करून बाळगोपाळानी या दहीहंडीचा मनमुराद आनंद लुटला. ही दहीहंडी मुलींकडून फोडण्यात आली.