पालघर : आदिवासी भागात कुपोषण, बालमृत्यू होऊ नयेत यासाठी आरोग्य विभागासह इतर सर्व प्रशासकीय विभागांनी दक्ष रहावे. पुढील चार महिने मिशन म्हणून काम करावे, असे निर्देश आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी येथे दिले.
पालघर जिल्ह्यातील कुपोषण व बालमृत्यू प्रश्नासंदर्भाबाबत उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकासमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री विष्णू सवरा, आमदारअमित घोडा, जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हा पेालीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री म्हणाले की, पुढील चार महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. आदिवासी भागात तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी १०८ ची विशेष रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून द्यावी. या रुग्णवाहिकेमधील डॉक्टरांनी घरोघरी जाऊन तपासण्या कराव्यात. जवळच्या खाजगी रुग्णालयाशी संलग्न राहून आवश्यकतेनुसार रुग्णांना तेथे स्थलांतरीत करावे त्यामुळे त्यांना तात्काळ औषध उपचार मिळून होणारे नुकसान कमी होईल. आदिवासी पालक व मुलांचे होणारे स्थलांतर यावर संबंधित जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी नोंद घेऊन स्थलांतरीत होणाऱ्या आदिवासींची माहिती ज्या ठिकाणी ते स्थलांतर करतील त्या ठिकाणच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना आदिवासींच्या औषधोपचारासह कळविल्यास त्यांना त्याठिकाणी औषध उपचार देणे सोपे होईल. वैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय सेवेतील पदे तत्काळ भरावी. कंत्राटी पद्धतीच्या कामगारांची यादी तयार करावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
आदिवासी विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन आदिवासी विभागासह इतर विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी अधिक जागृक राहून काम करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ.प्रशांत नारनवरे यांनी आदिवासींना खात्रीने धान्य मिळावे यासाठी धान्य दिन ठरवून त्यादिवशी धान्याचे वाटप करण्याचे नियोजन असल्याचे तसेच जिल्ह्यातील उपाययोजनांची माहिती यावेळी दिली.
ग्रामपंचायत स्तरावर कम्युनिटी किचन योजनेबाबतची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी यावेळी दिली.