डोंबिवली : नोकरदार महिलांना मासिक पाळीचा त्रास होत असतो. खेड्या-पाड्यात आजही पॅडचा वापर कसा करायचा हे माहित नसते. हे लक्षात घेऊन संजीवनी आदिवासी ग्रुप व ‘जीवनदायी पुण्य की एक श्राप’ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी विभागात तरुण मुली व महिलांसाठी पॅडचा वापर कसा करायचा याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुवारी डोंबिवलीत करण्यात आले.
पूर्वेकडील संजीवनी रुग्णालयात एका छोट्या समारंभात डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी गुंजन झोपे, कविता नायर, आरती फॉऊंडेशनचे राहुल चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना डॉ. पाटील म्हणाले, खेड्या-पाड्यात आणि विशेषतः आदिवासी भागात मासिक पाळीच्या काळात पॅडचा वापर करायचा असतो हे माहित नाही. यावेळी त्या महिला साधे कापड वगेरे वापरतात. त्या कपड्याने हायजनिक समस्या निर्माण होतात. याचा परिणाम जंन्म घेणाऱ्या बालकावर होण्याचा संभव असतो. जर महिलांनी पॅडचा वापर केला तर जन्माला येणाऱ्या मुलांचे आरोग्य चांगले राहील हे लक्षात घेऊन आदिवासी भागातील 20 गावांमध्ये पॅडचा वापर कसा करायचा याच शिक्षण व पॅड वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये कुंडाचापाडा, धामणवाडी, कोपऱ्याचीवादी बांधणवाडी, बेलकी आदी गावांचा समावेश आहे.
प्रकल्पाच्या संस्थापिका गुंजन झोपे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांची टीम आदिवासी पाड्यात जाऊन आदिवासी महिलांना, मुलींना पॅड कसा वापरायचा याचे शिक्षण देऊन पॅडचे मोफत वाटप करणार आहेत. गुंजन झोपे यांच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या अनोख्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.