
रत्नागिरी : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे दोन दिवस रत्नागिरी दौर्यावर येत आहे. यावेळी त्यांच्या हस्ते विविध विकासकामांची उदघाटने तसेच भूमिपूजन करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रविंद्र वायकरही उपस्थित राहणार आहेत. २३ व २४ ऑक्टोंबर रोजी आदित्य ठाकरे यांचा दौरा असणार आहे.
मंगळवार २३ ऑक्टोबर रोजी ठाकरे यांचं रत्नागिरीत आगमन होणार असून सकाळी १०.३० वाजता हिंदू हृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे तारांगणाचे भूमिपुजन करण्यात येणार आहे. सुमारे ५ कोटी ५० लाख रुपये खचुर्न मुंबईतील नेहरु तारांगणाच्या धर्तीवर हे तारांगण उभारण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ११.१५ वाजता सुमारे ८० लाख रुपये खर्चुन उभारण्यात आलेल्या जिल्ह्यातील पहिल्या ऍक्टीव्हीटी सेंटरचे उद्घाटन यावेळी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजुर झालेल्या विविध तालुक्यातील रस्त्यांचे भूमिपुजनही करण्यात येणार आहे. यात दुपारी १२.१५ वाजता करबुडे-धनावडेवाडी (जि.रत्नागिरी) (५.४४२ किमी), दुपारी १.४५ वाजता आगरनरळ ( ६.२७५ किमी) येथील त्याचबरोबरच दुपारी ४ वाजता वाझोले (५.६४० किमी) मुख्य रस्ताचा समावेश आहे.
बुधवार २४ ऑक्टोबर रोजी विविध तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील मंजुर रस्त्यांचे भूमीपुजनही आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यात राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ पाथरट-चिंद्रवली रस्ता (८.६३३ किमी), लांजा धुंदरे, बेनी वडगाव गोवेली रस्ता (१०.८०० किमी), भांबेड- हर्षखळे दोलरखिंड रस्त्याचा (७.००० किमी), कोंडये पांगरे – हसोल मोसम ते केळवली (१५.२०० किमी) रस्त्यांचा समावेश आहे. यानंतर सायंकाळी ५ वाजता देवाचे गोठणे -धाउलवल्ली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे उद्घाटन करण्यात येणार असून सायंकाळी ६ वाजता साखरीनाटा येथे अपघातग्रस्तांची पालकमंत्री रविंद्र वायकर भेट घेणार आहेत.