मुंबई, 22 June : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळील खाण साईटच्या प्रस्तावित लिलावाच्
यापूर्वी दोन वेळा, एकदा १९९९ आणि नंतर २०११ च्या दरम्यान, मुल्यमापन केल्यानंतर लिलाव रद्द करण्यात आला होता. मग यामुळे ताडोबा आणि अंधारीच्या वन्यजीव कॉरिडॉरचा नाश होणार आहे हे आपल्याला माहित असताना आपण या प्रक्रियेसाठी पुन्हा वेळ आणि शक्ती का वाया घालवायची, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे. जवळपास १० वर्षांपूर्वी तत्कालीन केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांनी हा नाश थांबविला होता. त्यांनी त्या क्षेत्राचे सर्वेक्षण केले होते आणि खाण साईट योग्य नाही असे अहवालात सूचित केले होते. या भागाचे पुन्हा संरक्षण करावे, अशी विनंती मंत्री श्री. ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री श्री. जावडेकर यांना केली आहे.
प्रस्तावित बांदर कोळसा खाण प्रकल्प हा वन्यजीव कॉरिडॉरमध्ये आहे आणि विशेषत: हे क्षेत्र व्याघ्र कॉरिडॉरमध्ये असल्याने यापूर्वी खाण प्रकल्पास असहमती दर्शविण्यात आली होती. तत्कालीन मुख्य वनसंरक्षक आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक यांनीही यावर आक्षेप घेतला होता. या खाण प्रकल्पामुळे मध्य भारतात असलेले व्याघ्र संरक्षित क्षेत्र आणि वनक्षेत्र विस्कळीत होईल, त्यामुळे प्रस्तावित खाणकामास असहमती दर्शविली होती. खाणींमुळे तसेच वाघांसाठीच्या कमी होत चाललेल्या संरक्षित क्षेत्रामुळे महाराष्ट्रात आणि विशेषत: चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष वाढतो आहे. त्यामुळे सध्या जी क्षेत्रे संरक्षित आहेत किमान त्यांचे तरी आपण वन्यजीव आणि पर्यावरणाकरिता संरक्षण करणे गरजेचे आहे, असे मंत्री श्री. ठाकरे यांनी म्हटले आहे.